भविष्यात सुपरसॉनिक विमानातून प्रवास होणार! विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कमाल, ‘असं’ आहे नियोजन
ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने धावणारे विमान तयार करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. याला सुपरसॉनिक विमान म्हटलं जातंय.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाने गोष्टी इतक्या सोप्या केल्या आहेत की आपण कल्पनाही करू शकत नाही. फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मनुष्याला बऱ्याच गोष्टी शक्य आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते आहे प्रवास. पूर्वी ज्या ज्या ठिकाणी जायला 4-5 दिवस लागायचे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माणूस आता तिथे काहीच तासात पोहचू शकतो. 2 तासात पोहचतात काही ठिकाणी लोकं. आता माणूस त्याही पुढची तयारी करतोय.
ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने धावणारे विमान तयार करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. याला सुपरसॉनिक विमान म्हटलं जातंय.
डेली मेलच्या वृत्तानुसार, उड्डाण किंवा विमान वाहतूक संकल्पनेशी संबंधित स्पॅनिश डिझायनर ऑस्कर विनाल्स यांनी लंडन ते न्यूयॉर्क शहर हे सुमारे 5 हजार किलोमीटरचे अंतर अवघ्या 80 मिनिटांत पूर्ण करू शकेल, असे विमान तयार करण्याची योजना सुरू असल्याचे म्हटले आहे.
येत्या काळात सुमारे 170 प्रवासी या विमानातून जाऊ शकतात. त्याचबरोबर या विमानाचा वेग आवाजापेक्षा तिप्पट असेल, असा दावा त्यांनी केलाय. याचा अर्थ हे विमान काही मिनिटांतच एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहचेल.
रिपोर्टनुसार हे विमान बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला ‘हायपर स्टिंग’ असं नाव देण्यात आलं आहे. या स्पॅनिश तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान कोल्ड फ्यूजन न्युक्लिअर रिॲक्टरच्या मदतीने चालवण्यात येणार आहे. त्यामुळे कदाचित त्याला सुपरसॉनिक विमान असे नाव दिले जाईल.
आतापर्यंत केवळ क्षेपणास्त्र किंवा लष्करी उपकरणांमध्येच अणुघटकांचा वापर करण्यात आला आहे, मात्र आता लवकरच सामान्य विमानांसाठीही त्याचा वापर केला जाणार आहे.
या विमानात रॅमजेट इंजिन आणि नेक्स्ट जेन हायब्रिड टर्बोजेट पावर असणारे. हायपर स्टिंग विमानाची लांबी तीनशे फुटांपेक्षा जास्त असेल आणि एका पंखापासून दुसऱ्या पंखापर्यंत त्याची रुंदी 150 फुटांपेक्षा जास्त असेल. आगामी काळ सुपरसॉनिक विमानांचा आहे, अनेक आव्हानांवर मात करावी लागणारे हे मात्र नक्की.