Viral Lovestory: आधुनिक सावित्रीने कॅन्सरपासून सत्यवानाचे प्राण वाचविण्यासाठी त्याच्याशी लग्न केलं! एका लग्नाची गोष्ट…वाचाच!
पण लग्न केलं इतकीच सिमीत असणारी ही गोष्ट आहेका? नाही. खरं तर या लग्नाची गोष्ट फार सोपी, सुंदर आणि मनाला आवडणारी आहे. ते आधीपासून एकमेकांना ओळखत होते खरे पण गोष्ट लग्नापर्यंत गेली कशी?
सावित्री आणि सत्यवानाची कथा माहितीच असेल! सावित्री आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत आणते अशी ती प्रसिद्ध पुराणकथेतील कथा! अशीच एक आधुनिक सावित्री सध्या चर्चेत आहे. फेसबुकच्या नवी उमेद या पेजवर एक गोष्ट पोस्ट करण्यात आलीये. ही गोष्ट आहे आधुनिक सावित्रीची, सोनाली डांगेची! सोनाली डांगेनी (Sonali Dange) एका अशा मुलासोबत लग्न केलं ज्या मुलाला कॅन्सरचं निदान झालेलं होतं. ती स्वतः परिचारिका (नर्स) आहे. सोनाली म्हणते, “कॅन्सर (Cancer)असणाऱ्या रुग्णांना भक्कम पाठिंबा आणि आधाराची गरज असते.” सोनालीच्या नवऱ्याला, प्रथमेशला 20 व्या वर्षी कॅन्सर झाला, सोनालीला समजताच तिने जराही विचार न करता लग्न करायचा निर्णय घेतला. पण लग्न केलं इतकीच सिमीत असणारी ही गोष्ट आहेका? नाही. खरं तर या लग्नाची गोष्ट फार सोपी, सुंदर आणि मनाला आवडणारी आहे. ते आधीपासून एकमेकांना ओळखत होते खरे पण गोष्ट लग्नापर्यंत (Viral Marriage)गेली कशी? गोष्ट वाचा नक्की आवडेल…
एका लग्नाची गोष्ट!
प्रथमेश आणि सोनाली डांगे हे हातखंबा, डांगेवाडीत राहतात. एकाच वाडीत असल्याने पूर्वीपासून एकमेकांचा परिचय होता. दोघं खूप चांगले मित्र. सोनालीला नर्सिंग प्रवेशासाठी पैशाची गरज होती. सोनालीने आपली समस्या घरच्यांबरोबर प्रथमेशलाही सांगितली. सोनालीच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक. फी भरणं अशक्यच होतं. म्हणून प्रथमेशने आपले दागिने विकून तिची फी भरली. इतकेच नव्हे, तो दर महिन्याला तिला खर्चासाठीही पैसे देत होता. सोनालीच्या शिक्षणात प्रथमेशचा फार मोठा हातभार आहे. सोनालीला त्याची जाणीव पण होती.
सोनालीने निश्चय केला
दरम्यानच्या काळात प्रथमेशला कॅन्सर झाल्याचं सोनालीला कळलं. त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. अवघ्या 20 व्या वर्षी कॅन्सर झालेला प्रथमेश पूर्णपणे खचून गेला होता. त्याला मदत करायचा निर्णय सोनालीने घेतला, चांगला माणूस आणि मित्र म्हणून जराही उशीर न करता सोनालीने लग्नही केलं. 25 जून 2018 रोजी सोनाली आणि प्रथमेशचा विवाह झाला. प्रथमेशला या सगळ्या अडचणीतून बाहेर काढण्याचा सोनालीने निश्चय केला होता. आजही, प्रथमेशवर उपचार सुरू आहेत पण त्याची प्रकृती स्थिरावलेली आहे. एका कार्यालयात तो अकाऊंट विभागात नोकरी करतो आहे. तर, सोनाली नगरपरिषदेत आरोग्यसेविका म्हणून काम करत आहे.
वैद्यकीय उपचाराबरोबर प्रेमाचीही गरज
कॅन्सरग्रस्त रूग्णांना भक्कम पाठिंबा आणि आधाराची गरज असते. प्रथमेशच्या घरच्यांनी त्याला साथ दि्ली. आणि त्याला नैराश्यातून बाहेर काढण्याची मोठी कामगिरी सोनालीने केली. त्यामुळेच आज प्रथमेश चांगल्यापैकी स्थिर झाला आहे. “प्रथमेशवर उपचार सुरू होते, तेव्हा त्याच्या यातना मला चांगल्या प्रकारे कळत होत्या. मी केवळ मैत्रीण म्हणून नव्हे, तर एक नर्स असल्यानेही त्या वेदना जाणवत होत्या. अशा वेळी माणसाला वैद्यकीय उपचाराबरोबर प्रेमाचीही गरज असते. आज ना उद्या प्रथमेश पूर्णपणे बरा होईल याची मला खात्री आहे. त्याची जगण्याची उमेद आता दुपटीने वाढली आहे. सासू-सासरे मार्गदर्शक म्हणून उभे राहिले आहेत,” सोनाली सांगते.