पॅरिस : 28 नोव्हेंबर 2023 | भारतात लग्न म्हणजे समारंभ आणि मोठा सोहळा. हा सोहळा आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जातो. आपल्या मुलीच्या लग्नासाठी अनेकदा वडील आयुष्यभराची पुंजी खर्ची करतात. पण लग्न हा धूमधडाक्यातच झाला पाहिजे, असं अनेकांचं मत असतं. अगदी प्रवेशद्वारापासून ते जेवणाऱ्या मेन्यूपर्यंतची प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईने विचार करून ठरवली जाते. ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ हे नाव या सर्व तयारींपासूनच मिळालं असावं. भारतात असे बरेच लग्नसोहळे पार पडले, ज्यांची चर्चा केवळ देशभरातच नाही तर जगभरात रंगली. सध्या असाच एक लग्नसोहळा तुफान चर्चेत आहे. या शतकातील हे सर्वांत मोठं लग्न असल्याचं म्हटलं जात आहे. पण हा लग्नसोहळा भारतातील नसून पॅरिसमधील आहे.
26 वर्षीय मॅडेलाइन ब्रॉकवे आणि जेकब लाग्रोन यांनी पॅरिसमध्ये एका भव्य समारंभात लग्न केलं. ही जोडी खूप प्रसिद्ध आहे, अशी बाब नाही किंवा हे दोघं मोठे सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहे, असंही नाही. मात्र तरीही या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. जवळपास आठवडाभर हा लग्न समारंभ सुरू होता. या समारंभात ब्रॉकवेनं असे कपडे परिधान केले होते, जे सर्वसाधारण तर अजिबात नव्हते.
लग्नासाठी या जोडप्याने वर्सेल्सचा अत्यंत महागडा आणि आलिशान पॅलेस भाड्याने घेतला होता. इतकंच नव्हे तर लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांसाठी खासगी विमानाची सोय करण्यात आली होती. या विमानातून पाहुण्यांना पॅरिसला नेण्यात आलं होतं. या भव्य लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
बिल युसेरी मोटर्समध्ये वधूचे वडील रॉबर्ट ‘बॉब’ ब्रॉकवे हे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात. त्यांची कंपनी फ्लॉरिडामधील कोरल गेबल्स आणि कटलर बे इथं मर्सिडीज बेंझ डीलरशिपचं काम करते. त्यामुळे या अत्यंत भव्य लग्नात खर्च करण्यात आलेला पैसा आणि एका समृद्ध कौटुंबिक व्यवसायाशी असलेला संबंध सहज लक्षात येतो. या लग्नावर तब्बल 59 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 491 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 18 नोव्हेंबर रोजी हे लग्न पार पडलं.