या नवरीने बिदाईचा अर्थच बदलून टाकला, सासरी जाताना ‘बाबूल की दुआएँ’ बाहेरच्याला तर धक्का जवळच्यांना दिला
प्रेमात लोक वेडे होतात. अशावेळी ते काहीही करायला तयार होतात. अगदी कुठल्याही थराला जाऊन त्यांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहायचं असतं.
प्रेमात लोकं आंधळी असतात. प्रेमात लोक वेडे होतात. अशावेळी ते काहीही करायला तयार होतात. अगदी कुठल्याही थराला जाऊन त्यांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहायचं असतं. अनेक किस्से आपणही ऐकलेत. कधी कुणी लग्नातून पळून गेलं, कधी कुणी लग्नाआधी पळून गेलं, कुणी तर लग्नानंतर सुद्धा पळून गेलेलं आहे. पण कधी तुम्ही असं ऐकलंय का की लग्न झाल्यानंतर सासरी जातानाच एखादी मुलगी प्रियकरासोबत पळून गेलीये. अशीच एक घटना घडलीये.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये लग्नानंतर काही तासांतच एक नववधू प्रियकरासोबत पळून गेली. लग्नाचे सर्व विधी आटोपून नववधू पतीला सोडून प्रियकरासोबत दुचाकीवरून पळून गेल्याची घटना उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
लग्न उरकून दोघेही आग्र्याला रवाना झाले होते. आपल्या वधूला दुसऱ्या कुणासोबत जाताना पाहून नवरदेव जोरात ओरडला, त्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी दुचाकी पकडण्यासाठी धाव घेतली.
कारमधील नवऱ्यानेही दुचाकीचा पाठलाग केला, दरम्यान स्वत:ला आपण आता अडचणीत सापडू असा अंदाज आल्यावर प्रियकराने वधूला रस्त्याच्या मधोमध सोडून घटनास्थळावरून पळ काढला. सध्या नवविवाहित वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय उत्तर पोलिस ठाण्यात पोहोचले असून तेथे परस्पर समझोता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.