SSC Results 2022: ओहो पाजी कमाल कर दित्ता! फक्त 12 वर्षांचा सहेजप्रीत दहावीत 62% मिळवून उत्तीर्ण
आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे? शंभर टक्के मिळालेले सुद्धा 122 विद्यार्थी आहेत. पण जर तुम्हाला या मुलाचं वय कळलं तर तुम्हाला नक्की हे काहीतरी विशेष वाटेल. दहावीची परीक्षा देणारे इतर विद्यार्थ्यांचं वय असतं 14 पण या साहेजप्रीत सिंगचं वय आहे 12 !
नवी मुंबई : खारघर मधला केपीसी शाळेतला विद्यार्थी सहेजप्रीत सिंग दहावीला 62% मिळवून पास दहावी उत्तीर्ण (SSC Pass) झालाय. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे? शंभर टक्के मिळालेले सुद्धा 122 विद्यार्थी आहेत. पण जर तुम्हाला या मुलाचं वय कळलं तर तुम्हाला नक्की हे काहीतरी विशेष वाटेल. दहावीची परीक्षा (SSC Exam)देणारे इतर विद्यार्थ्यांचं वय असतं 14 पण या सहेजप्रीत सिंगचं वय आहे 12! म्हणजे दहावीच्या (SSC Results 2022) इतर मुलांपेक्षा दोन वर्षाने लहान असणाऱ्या साहेजप्रीत सिंगने 62% मिळवून एक नवीन रेकॉर्ड सेट केलाय, हा रेकॉर्ड आहे दहावी उत्तीर्ण झालेला राज्यातील सर्वात तरुण उमेदवार!
पायलट कोर्स करायची इच्छा
आपला जास्तीत वेळ गेमिंग ऍप्स बनवण्यात घालवणारा आणि टेक्नॉलॉजीची प्रचंड आवड असणारा सहेजप्रीत म्हणतो, “मी विज्ञान शाखेत प्रवेश घेईन आणि त्यानंतर माहिती तंत्रज्ञानात आयआयटीमधून बीटेकमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करेन”, पायलट कोर्स करायची सहेजप्रीतची इच्छा आहे. “बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी वय हा एक घटक असू नये,” असे सहेजप्रीत म्हणतो. एप्रिलमध्ये दहावीची परीक्षा संपल्यानंतर लगेचच साहेजप्रीत 11 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यासाठी उतरला, असे त्याचे वडील गुरुशरण यांनी सांगितले.
शिक्षण खात्याकडून विशेष परवानगी
सहेजप्रीतला दहावीची परीक्षा देण्यासाठी ‘शिक्षण खात्याकडून विशेष परवानगी मिळाली असावी,’ अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव एस.आर. बोरस्ते यांनी दिलीये.सामान्य परिस्थितीत, नियमित किंवा खाजगी विद्यार्थी म्हणून एसएससी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याचे वय 14 वर्षे असणे आवश्यक आहे.एका वृत्तपत्राला माहिती देताना शाळेच्या पर्यवेक्षकांनी या माहितीला दुजोरा दिलाय. गेल्या वर्षी साहेजप्रीत सिंग कुटूंबासह मथुरेहून नवी मुंबईत राहायला आला. त्यावेळी गुरुशरण यांना आपल्या मुलाला दहावीत प्रवेश मिळवून देणं कठीण गेलं होतं. “इथल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आम्हाला खूप ठिकाणी धाव घ्यावी लागली. आम्ही शिक्षण विभागाशी संपर्क साधला आणि शेवटी त्याला दहावीत प्रवेश देण्याची परवानगी मिळाली,” असे त्याच्या वडिलांनी सांगितले.