काही लाेकांना इतरांपेक्षा जास्त मच्छर का चावतात? या मागे आहे शास्त्रीय कारण
एखाद्या व्यक्तीला चावायचं हे डासांना हे कसं कळतं? हा प्रश्न तुम्हालादेखील पडत असेल तर नक्की वाचा.
मुंबई, तुमच्या सभोवतालच्या इतरांपेक्षा तुम्हाला नेहमीच जास्त डास चावतात (mosquito Bite) का? याचे उत्तर जर हो असेल तर या मागे काही शास्त्रीय कारण आहे हे जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, वेगवेगळ्या अभ्यासातून वेगवेगळे निष्कर्ष समाेर आले आहेत. रक्तगट हे यामागचे एक कारण असू शकते. रक्ताचा प्रकार तसेच इतर अनेक घटक हे ठरवतात की तुम्ही डासांसाठी किती आकर्षक आहात. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि झिका यांसारख्या विविध घातक आजारांचा प्रसार करण्यासाठी डास कारणीभूत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, इतरांपेक्षा काही लोकांकडे डास जास्त आकर्षित हाेण्यामागे रक्तगट हे कारण असू शकते. याशिवाय इतरही गाेष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत.
डास चावणे आणि रक्त गट यांचा काय संबंध आहे?
संशोधक आणि शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून डासांचे वर्तन आणि नमुने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसाधारणपणे, डास इतर रक्तगटाच्या लोकांपेक्षा O रक्तगट असलेल्या लोकांना चावण्यास प्राधान्य देतात. तसेच डास हे रक्ताच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून, नॉन-सेक्रेटर्सपेक्षा सेक्रेटर्सकडे जास्त आकर्षित होतात.
एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, डासांच्या काही प्रजाती O रक्तगट असलेल्या लोकांकडे दुप्पट आकर्षित होतात. O हा डासांचा पसंतीचा रक्त गट आहे आणि A हा सर्वात कमी पसंतीचा आहे. B रक्तगट असलेले लोकं O आणि A स्पेक्ट्रमच्या मध्ये कुठेतरी येतात.
हे घटकदेखील डासांना करतात आकर्षित
शरीराचा वास
जर डासांना तुमच्या शरीराचा वास आवडत असेल तर ते तुमच्याकडे जास्त आकर्षित हाेतील. तुमच्या शरीराच्या वासावर परिणाम करणाऱ्या काही प्रमुख घटकांमध्ये या गाेष्टींचा समावेश आहे.
- कार्बन डाय ऑक्साइड- जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा तुम्ही कार्बन डाय ऑक्साईड सोडता, ज्यानंतर डास येतात. हवेतील कार्बन डायऑक्साइडची वाढती पातळी डासांना सांगते की संभाव्य शिकार जवळपास आहे.
- चयापचय दर- जर तुमचा चयापचय दर जास्त असेल, तर तुम्ही जास्त कार्बन डायऑक्साइड तयार कराल, ज्यामुळे तुम्हाला डास चावण्याची शक्यता वाढते. याचा अर्थ असा की, ज्या लोकांचा चयापचय दर जास्त आहे किंवा अलीकडेच व्यायाम केला आहे ते डासांच्या चाव्यासाठी अधिक आकर्षक लक्ष्य आहेत.
- मद्यपान- 2002 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, मद्यपान करणाऱ्या लोकांकडे डास अधिक आकर्षित होतात. अभ्यासात सहभागी झालेल्यांना बिअर प्यायल्यानंतर जास्त डास चावले.
- गर्भधारणा- दुस-या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, डास गर्भवती महिलांकडे जास्त आकर्षित होतात. हे गर्भवती महिलांच्या शरीराचे तापमान आणि चयापचय दर जास्त असल्यामुळे असू शकते.