बापरे! 37 हजार फुटांवरून विमानाचा दरवाजा उघडायला गेली, म्हणे “येशूने सांगितलं”
ती अचानक आपल्या जागेवरून उठली आणि दरवाज्याजवळ गेली आणि तिने ते उघडण्याचा प्रयत्न केला.
अमेरिकेतील विमानात एका महिला प्रवाशाने उड्डाणादरम्यान 37 हजार फुटांवर विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघण्याआधीच एका प्रवाशाने त्याला अडवले. यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आणि महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या महिलेचे म्हणणे आहे की तिला स्वत: येशूने असे करण्यास सांगितले होते.
रिपोर्टनुसार, ‘साउथवेस्ट एअरलाइन्स’चं हे विमान टेक्सासमधील ह्यूस्टनहून कोलंबसला जात होतं, ज्यात 34 वर्षीय एलोम अगबेग्निनोऊ विमानात होती.
ती अचानक आपल्या जागेवरून उठली आणि दरवाज्याजवळ गेली आणि तिने ते उघडण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर येशूने तिला ओहायोला जाण्यास सांगितलं होतं आणि आता दरवाजा उघडायला सांगितला होता असं ती म्हणाली. ही महिला विमानाच्या दरवाजावर डोकं आपटत होती.
महिलेचे हे कृत्य पाहून विमानातील इतर प्रवासी घाबरले. आता विमान कोसळेल, असं त्यांना वाटत होतं. अशात काही प्रवाशांनी महिलेला अडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तिने एका प्रवाशाला मांडीवर चावा घेतला.
कसंबसं या महिलेला अडवण्यात आलं. विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर क्रू मेंबर्सने महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले.
सोमवारी अर्कान्सासच्या जिल्हा न्यायालयातून एक कागदपत्र प्रसिद्ध करण्यात आले, ज्यात लिहिले होते की, “ही वेडी महिला विमानाच्या उड्डाणादरम्यान विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत होती.” हे करत असताना ती वारंवार सांगत होती की, येशूने तिला तसे करण्यास सांगितले होते.
जेव्हा या महिलेला घडलेल्या प्रकाराबद्दल विचारण्यात आलं तेव्हा “शनिवारी मी माझ्या नवऱ्याला न सांगता आणि मेरीलँडमधील एका कौटुंबिक मित्राला भेटण्यासाठी बॅग न घेता घर सोडले. सहसा मी अशा गोष्टी अजिबात करत नाही.” अशी प्रतिक्रिया तिने दिली.