चंदनाच्या लाकडापेक्षा हजारो पटीने महाग, एक ग्रॅमची किंमत तब्बल 7 लाख, भारतात जगातलं सर्वात दुर्मिळ लाकूड
चंदन लाकडापेक्षाही कैक पटीने महाग असलेलं लाकूड हे अकीलारिया नावाच्या झाडापासून मिळतं. या लाकडाला अगरवुड, ईगलवुड किंवा एलोसवुड असंही म्हणतात.
मुंबई : आपल्याकडे चंदनाच्या लाकडाला खूप महत्त्व आहे. याशिवाय हे लाकूड जवळपास 5 ते 6 हजार रुपये किलो किंमतीने विकत मिळतं. या लाकडाचे फर्निचर खूप महाग असतात. पण आम्ही तुम्हाला या लाकडापेक्षाही कित्येक पटीने महाग असलेल्या एका लाकडाच्या प्रजातीची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे हे दुर्मिळ लाकूड भारतातही काही प्रमाणात आढळतं. त्यामुळे भारतासाठी देखील ही एक अभिमानाची बाब आहे.
जगातलं सर्वात महाग आणि दुर्मिळ लाकूड
चंदन लाकडापेक्षाही कैक पटीने महाग असलेलं लाकूड हे अकीलारिया नावाच्या झाडापासून मिळतं. या लाकडाला अगरवुड, ईगलवुड किंवा एलोसवुड असंही म्हणतात. हे लाकूड जगभरातील मोजक्याच देशांमध्ये आढळतं. त्यामध्ये आपल्या भारताचा देखील समावेश आहे. हे लाकूड भारतासह चीन, जपान तसेच ईशान्य आशियाई देशांमध्ये आढळतं.
अगरवुड लाकूड हे जगातील सर्वात दुर्मिळ लाकूड आहे. या लाकडाची किंमत सोनं-चांदी, हिऱ्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त आहे. भारतात एक ग्रॅम हिऱ्याची किंमत जवळपास 3 लाख 25 हजार रुपये इतकी आहे. तर 1 तोळे (10 ग्रॅम) सोन्याची किंमत 47 हजार 692 रुपये इतकी आहे. पण अगरवुड लाकडाच्या एका ग्रॅमची किंमत तब्बल 10 हजार डॉलर म्हणजेच 7 लाख रुपये इतकी आहे.
लाकडापासून तयार होणारं तेलही प्रचंड महाग
अगरवुड लाकडाला जपानमध्ये क्यानम नावाने ओळखलं जातं. या लाकडापासून अत्तर किंवा परप्यूम बनवलं जातं. विशेष म्हणजे लाकूड सडल्यानंतरही त्याचा अत्तर तयार करण्यासाठी वापर केला जातो. या लाकडापासून तेल निर्माण केलं जातं. या तेलची किंमत तब्बल 25 लाख रुपये इतकी आहे. याच तेलचा उपयोग करुन सेंटची निर्मिती केली जाते.
अगरवुड लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी
अगरवुड लाकूड हे दुर्मिळ आणि प्रचंड महाग असल्याने या लाकडाला वुड ऑफ गॉड म्हणजे देवाचं लाकूड म्हटलं जातं. अकीलारियाचे झाडे हे हाँगकाँग, चीन आणि जपानमध्ये बऱ्यापैकी आहेत. पण या झाडाच्या लाकडाची किंमत जास्त असल्याने या झाडांच्या भरपूर कत्तली करण्यात येत आहेत. या लाकडाची प्रचंड तस्करी केली जात आहे. त्यामुळे अकीलारियाचे झाड नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांकडून अनेकदा वर्तवण्यात आली आहे. काही संघटना या झाडाची प्रजाती वाचविण्यासाठी काम करत आहेत.
भारतात त्रिपुरा सरकारचे अगरवुडच्या झाडांसाठी विशेष मोहिम
अगरवुड लाकूड देणाऱ्या अकीलारियाच्या झाडांची बागायत करुन दोन हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचं ध्येय ठेवण्याचा निर्णय भारतातील त्रिपुरा सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. त्रिपुरा सरकारने अकीलारियाचे झाडांची शेती करुन 2021-22 या आर्थिक वर्षात 75 हजार किलो अगर चिप्स आणि 1500 किलो अगर तेलाची निर्यात करण्याचं धोरण आखलं आहे. विशेष म्हणजे त्रिपुरा राज्यात अकीलारियाचे 50 हजार वृक्ष आहेत. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन या विषयावर बातचित केली होती.
हेही वाचा :
तुमची डिग्री नकली तर नाही? पुण्यात बनावट मार्कमेमो, सर्टिफिकेट वाटणारी टोळी जेरबंद