Fraud : WhatsApp, Facebook वर थापड्यापासून सावध रहा, ही काळजी नाही घेतली तर खाते साफ..
Fraud : सोशल मीडियावर थापडे भेटतातच. गोडगोड बोलून, आपबित्ती सांगून ते सहज गंडा घालतात.
नवी दिल्ली : सोशल मीडिया (Social Media) साईट तरुणाईचा अड्डा झाला आहे. याच ठिकाणी थापडे भेटतातच. गोडगोड बोलून, आपबित्ती सांगून ते सहज गंडा (Fraud) घालतात. त्यांच्या पासून सावध राहण्याचा या काही टिप्स आहेत, त्याचे पालन तुम्ही करायला हवे..
हे सायबर भामटे व्हाट्सअप, फेसबूक आणि अन्य सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या युझर्सवर लक्ष ठेवतात आणि त्यांना लक्ष्य करतात. फेस्टिव्ह थीम, गेम, अॅप्सच्या लिंक फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअपवर टाकतात. त्यातून ते सावज हेरतात आणि थापा मारुन त्यांना गंडा घालतात.
वापरकर्त्याने आमिषाने अथवा सहज म्हणून या लिंकवर क्लिक केली. ती लिंक डाऊनलोड केली की, बोगस ब्राऊजर एक्सटेंशन डाऊनलोड होते. वापरकत्याने ती लिंक अॅक्टिव्ह केली की, लागलीच सायबर भामटा त्याची पर्सनल माहिती चोरतो आणि बँक खातेही साफ करतो. अथवा त्याचा गैरफायदा घेतो.
त्यामुळे सोशल मीडिया हाताळताने सजग राहणे आवश्यक आहे. आमिष दाखवणाऱ्या, मदत मागणाऱ्या, गेम्सच्या माध्यमातून बक्षिस जिंकण्याची ऑफर देणाऱ्या या फ्रॉड लिंकपासून दूर राहणे आवश्यक आहे.
फेसबूक वापरताना, तुमची अत्यंत वैयक्तिक माहिती फेसबूक प्रोफाईलवर शेअर करु नका. तुमच्या घराचा पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख ही माहिती सार्वजनिक करु नका. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका. फेसबूकच्या वापरानंतर खाते लॉग आऊट करा. ते तसेच सोडून दिल्यास त्याचा कोणी ही गैरफायदा घेईल.
सर्वेच्या नावाखाली ही फसवणूक होते. त्याआधारे तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते आणि त्याचा गैर उपयोग करण्यात येतो. त्यामुळे अशा अनोळखी सर्वे अथवा व्यक्तीला तुमचा मोबाईल क्रमांक देऊ नका.
तुमच्या क्रेडिट, डेबीट कार्डचा क्रमांक, सीव्हीव्ही, पिन, ओटीपी, इंटरनेट बँकिंग, युझर आयडी, युनिक रजिस्ट्रेशन क्रमांक ही कोणालाच शेअर करु नका. याच माध्यमातून सर्वाधिक फसवणूक करण्यात येते.