बँकेतील तुमचं लॉकर वर्षभर उघडलं नाही तर अडचणीत याल, जाणून घ्या कारण
Bank Locker | लॉकर तोडण्यापूर्वी बँकेकडून संबंधित ग्राहकाला ईमेल किंवा फोन करुन अथवा नोटीस पाठवून तशी सूचना दिली जाईल. मात्र, हे पत्र परत आले तर बँक लॉकर तोडण्याची कारवाई करु शकते. दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत हे लॉकर उघडावे आणि संपूर्ण प्रक्रियेचे व्हीडिओ चित्रण करावे, अशी अट रिझर्व्ह बँकेने घातली आहे.
मुंबई: अनेकजण आपल्याकडील मौल्यवान दागिने, वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित राहण्यासाठी बँकेच्या लॉकर्सचा वापर करतात. घरात चोरी झाल्यास हा ऐवज सुरक्षित राहावा, असा उद्देश त्यामागे असतो. त्यामुळे अनेक धनिक वर्षानुवर्षे हा ठेवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास प्राधान्य देतात. सुरक्षिततेची हमी असल्यामुळे अनेकदा या बँक लॉकरकडे फिरकूनही पाहिले जात नाही.
मात्र, रिझर्व्ह बँकेच्या बदललेल्या नियमानुसार तुम्हाला तीन महिन्यांतून एकदा बँक लॉकर उघडणे बंधनकारक आहे. काही दिवसांपूर्वीच यासंदर्भातील नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार एखाद्या ग्राहकाने दीर्घकाळ बँक लॉकर बंद ठेवले आणि तिकडे फिरकलाच नाही तर बँकेला हे लॉकर तोडण्याची परवानगी असेल.
लॉकर तोडण्यापूर्वी बँकेकडून संबंधित ग्राहकाला ईमेल किंवा फोन करुन अथवा नोटीस पाठवून तशी सूचना दिली जाईल. मात्र, हे पत्र परत आले तर बँक लॉकर तोडण्याची कारवाई करु शकते. दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत हे लॉकर उघडावे आणि संपूर्ण प्रक्रियेचे व्हीडिओ चित्रण करावे, अशी अट रिझर्व्ह बँकेने घातली आहे. लॉकर फोडल्यानंतर त्यामधील सामुग्री सीलबंद लिफाफ्यात ठेवली जाईल. त्यानंतर ही सामुग्री मालकाने दावा करेपर्यंत बँकेच्या मालकीच्या अन्य चीजवस्तूंसह ठेवली जाईल.
रिझर्व्ह बँकेची सुधारित नियमावली
* बँका आता लॉकर्ससाठी तीन वर्षांचे टर्म डिपॉझिट घेऊ शकतात. यामधून तीन वर्षांचे भाडे आणि गरज पडल्यास लॉकर फोडण्यासाठीच्या पैशांचा समावेश असेल. मात्र, सध्या बँकेत लॉकर्स असलेल्या ग्राहकांना टर्म डिपॉझिटची सक्ती केली जाणार नाही.
* बँकेच्या लॉकरमध्ये कोणतीही बेकायदेशीर किंवा धोकादायक गोष्ट ठेवू नये. गेल्या काही काळामध्ये बँकेच्या लॉकरमध्ये बेकायदेशीर वस्तू ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा नियम लागू केला आहे.
* ग्राहकाला लॉकर देताना बँकेने स्टॅम्पपेपरवर त्याचा करारनामा करावा.
* ग्राहकाने सलग तीन वर्षे भाडे थकवल्यास बँकेला लॉकर फोडण्याची परवानगी असेल.
* नैसर्गिक संकटामुळे अथवा देवाच्या करणीमुळे लॉकरमधील वस्तू गहाळ झाल्यास बँक त्यासाठी जबाबदार असणार नाही.
संबंधित बातम्या:
EPFO Rules: PF खातेदारांनो तात्काळ नॉमिनीचं नाव जोडा, अन्यथा 7 लाखांचं नुकसान होणार
Bank Strike : पुढचे दोन दिवस बँक बंद राहणार, SBI सह देशातील अनेक बँकांच्या कर्मचाऱ्यांचा संप
पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक कशी कराल, कमी पैसे खर्च करुन जास्त सोनं कसं साठवाल?