एफडी मध्ये गुंतवणूक करायची आहे? जाणून घ्या कोणती आहे योग्य वेळ
बँकांनी त्यांच्या मुदत ठेवीवरील व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. एचडीएफसी आणि बजाज फायनान्स यांनी ही सुरुवात केलेली आहे. कर्जावरील व्याजदर वाढत असल्यामुळे मुदत ठेवीवरील व्याज दर वाढीची शक्यता आहे.

मुंबई : बॅंकांची कर्जे महागणार आहेत. त्याचा थेट परिणाम मुदत ठेवीवर होणार आहेत. बॅंकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास सर्वच बॅंका मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ करतील. एचडीएफसी बॅंक आणि बजाज फायनान्स यांनी एफडीवरील व्याजदर वाढविले आहेत. नवीन वर्षात गुंतवणूक सुरू करण्याचा तुमचा संकल्प असेल तर आता त्याचा ग्राहकाला फायदा होईल. चांगल्या परताव्यासाठी आणि रक्कम सुरक्षित राहण्यासाठी ग्राहक एफडीकडे आकर्षित झाले आहे. या वर्षात मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर ही माहिती ग्राहकांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल.
एचडीएफसी, बजाज फायनान्सच्या एफडीत वाढ
एचडीएफसी बँकेने एक आणि दोन वर्षांच्या एफडीवर 5 पॉईंटने व्याजदरात वाढ केली आहे. आता मुदत ठेवींवरील व्याजदर 4.85 हून 4.90 टक्के झाला आहे. तर दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी मुदत ठेवीवरील व्याजदरातही ही चांगली वाढ करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेने दोन वर्षांसाठी व्याज दरात 4.50 टक्क्यांहून 5.15 टक्के वाढ केली आहे.
तर, बजाज फायनान्सने मोठ्या कालावधी नंतर मुदत ठेवीच्या व्याजदरात 30 पाईंटची वाढ केली आहे. 24 ते 35 महिन्यांसाठी मुदत ठेव योजनेत 6.35 हून व्याजदर 6.65 टक्के मिळणार आहे. तर 36 ते 60 महिन्यांच्या एफडीवरील व्याज 6.75 हून व्याजदर 7.05 टक्के व्याज झाला आहे.
कर्ज महागणार
कोविड महामारी मुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावरुन घसरली होती. अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी अनेक देशांनी उपाययोजना राबविल्या. कर्ज स्वस्त करण्यात आले. चलनी नोटा छापण्यात आल्या. परंतु, आता कर्ज महाग होण्यास सुरुवात झाली आहे, युरोपामध्ये अनेक देशांनी कर्ज पुरवठा करताना व्याजदर वाढविला आहे. तर अमेरिकेतून येत असलेल्या बातम्यांनुसार 2022 मध्ये तीनदा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.
कमी कालावधीची मुदत ठेव निवडा
क्रेडेंस वेल्थ ॲडवायझरचे मुख्य संचालक किर्तन शाह यांनी मुदत ठेव गुंतवणुकदारांना सल्ला दिला आहे. त्यानुसार, एफडी, बॉंड आणि डेट म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक न करता अल्पावधीसाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.यामुळे वाढीव व्याजदरांचा फायदा घेता येईल.परंतु वाढत्या महागाईविरोधात मुदत ठेवीवरील गुंतवणूक किती फायद्याची ठरेल याविषयी त्यांनी साशंकता व्यक्त केली.
महागाईचाही करा विचार
मे 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 4 टक्के कायम ठेवला होता. त्याचा परिणाम देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियावर झाला. जानेवारी 2020 मध्ये एसबीआयने मुदत ठेवीवर 6.10 टक्के व्याज दिले तर सध्या व्याजाचा हा दर 4.90 टक्के इतका आहे. तर महागाई दर 5 टक्के इतका आहे. क्रेडेंस वेल्थ एडवायझर चे सीईओ कीर्तन शहा यांच्या म्हणण्यानुसार, मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीत गुंतवणूक करण्याऐवजी अल्प मुदतीचा विचार करावा. त्यामुळे व्याजदर वाढीचा तुम्हाला फायदा होईल. दीर्घ मुदतीत रक्कम गुंतलेली असल्याने ती काढल्यास दंडही भरावा लागतो. त्यामुळे अल्प मुदतीची ठेव निवडणे फायद्याचे ठरते. कोरोनाचे नवे नवे रुप आणि व्हेरियंट बघायला मिळत असल्याने मनी 9 च्या सल्ल्यानुसार, व्याजदर हळूहळू वाढतील. गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करताना महागाईची ही विचार करणे आवश्यक आहे. तुमच्या गरजा भागल्यानंतर उरलेल्या रक्कमेतून गुंतवणूक करणे हितकारक असेल.
हेही वाचा :
इलेक्ट्रिक वाहनांच्या तेजीतून करायची कमाई, तर निफ्टी ऑटो ईटीएफमध्ये करा गुंतवणुकीची तयारी
LIC स्वस्तात मस्त पॉलिसी: 28 रुपयांची बचत, 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या फायदे