गावामध्ये राहून करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला मिळवाल चांगले उत्पन्न
Common Service Center | स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत केंद्र सरकार तरुणांना खेड्यात राहून पैसे कमवण्याच्या संधी देत आहे. अशा अनेक योजना आहेत, ज्याचा अवलंब करून एखादी व्यक्ती गावात राहून चांगले उत्पन्न मिळवू शकतो.
नवी दिल्ली: ग्रामीण भागात रोजगाराचे पुरेसे पर्याय नसल्याने अनेक तरुण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात शहरांमध्ये जातात. यामुळे गावांमधून स्थलांतराची समस्या गंभीर होत आहे. स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत केंद्र सरकार तरुणांना खेड्यात राहून पैसे कमवण्याच्या संधी देत आहे. अशा अनेक योजना आहेत, ज्याचा अवलंब करून एखादी व्यक्ती गावात राहून चांगले उत्पन्न मिळवू शकतो.
केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानातंर्गत देशभरात कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) उघडण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये बँकिंग आणि डिजिटल सुविधा पुरवण्याच्यादृष्टीने ही कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु केली जात आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. डिजिटल इंडिया अभियानंतर्गत आतापर्यंत देशभरात 4 लाखांहून अधिक CSC सेंटर उघडली गेली आहेत.
सार्वजनिक सेवा केंद्र उघडून तुम्ही दरमहा चांगले पैसे कमवू शकता. ही योजना तुम्हाला कमाईबरोबरच सार्वजनिक सेवेची संधी देते. जर तुम्हाला हे सर्व्हिस सेंटर उघडायचे असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर तुमची नोंदणी करावी लागेल. आपण कॉमन सर्व्हिस सेंटरसाठी register.csc.gov.in ला भेट देऊन नोंदणी करू शकता.
या कॉमन सर्व्हिस सेंटर्समुळे सरकारी योजना किंवा इतर कामांसाठी प्रत्येकवेळी सरकारी कार्यालयात धाव घ्यावी लागत नाही. CSC मध्ये शेती, आरोग्य, शिक्षण, बँकिंग आणि आर्थिक सेवा इत्यादी कामे होऊ शकतात. या केंद्रांवर जन्माचा दाखला, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची सुविधा उपलब्ध असते. तुम्ही केवळ दहावी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला संगणकाचे ज्ञान असेल तर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु करु शकता. देशातील सर्व राज्यांमध्ये CSC सेंटर्स PPP मॉडेलवर चालतात.
CSC सुरु करण्यासाठी काय करावे लागेल?
कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु करण्यासाठी www.csc.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. संकेतस्थळाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या CSC VLE या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडावा.
CSC च्या माध्यमातून पैसे कसे कमवाल?
कॉमन सर्व्हिस सेंटरवर होणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी सरकारकडून 11 रुपये दिले जातात. याशिवाय, ट्रेन, विमान, बस तिकीटांच्या बुकिंगवर 10 ते 20 रुपयांची कमाई होते. तसेच एखादे बिल भरण्यासाठी आणि सरकारी योजनांमध्ये नाव नोंदवण्याचे काम कॉमन सर्व्हिस सेंटरवर होऊ शकते.
संबंधित बातम्या:
आधार कार्डामुळे फसवणूक टाळायची असल्यास लवकर हा क्रमांक अपडेट करा, अन्यथा…
पॅनकार्ड हरवल्यास काय कराल, जाणून घ्या नवं पॅनकार्ड मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया