Edible oil | सूर्यफुलासह सोयबीन तेलाच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात, सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’; आयातावरील सीमा शुल्क रद्द
केंद्र सरकारच्या मास्टरस्ट्रोकमुळे देशभरातील खाद्यतेलाच्या किमती स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने सूर्यफुल आणि सोयाबीन तेलाच्या आयातीवरील सीमा शुल्क रद्द केले आहे.
देशातील सर्वसामान्यांसाठी आणि गृहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. इंधनावर सीमा शुल्क कपात केल्यानंतर केंद्र सरकारने (Central Government) आपला मोर्चा खाद्यतेलाकडे वळविला. मास्टरस्ट्रोक लगावत केंद्र सरकारने सूर्यफुलासह सोयाबीनच्या आयातीवरील सीमाशुल्क हटविले. त्यामुळे देशातील खाद्यतेलाच्या किंमती आटोक्यात येणार आहे. इंधनांवर (Fuel) आकारण्यात येणाऱ्या रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या उपकरात (Tax) पेट्रोलमध्ये (Petrol) 8 रुपये आणि डिझेलमध्ये 6 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यानंतर आता खाद्यतेल स्वस्त होणार आहे. सरकारने दरवर्षी 20 लाख टन कच्च्या सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाच्या आयातीवर सीमा शुल्क (Custom duty) आणि कृषी उपकरांना 31 मार्च 2024 पर्यंत पायबंद घातला आहे. त्यामुळे दोन वर्षे तरी तेलाच्या किंमती आटोक्यात राहतील. या निर्णयाचा फायदा थेट किचन बजेटवर होईल. वाढीव बजेटला ब्रेक लागण्यात या निर्णयाचा फायदा होणार आहे.
100 डॉलरने कमी झाल्या
यापूर्वी विदेशी बाजारात काद्य तेलांच्या किंमतीत तेजी दिसून येत असताना इंडोनेशियाने निर्यात बंदी उठवली. देशभरातील तेल-तेलबिया बाजारात गेल्या आठवड्यात घसरण दिसून आली. इंडोनेशियाने निर्यात खुली केल्यानंतर परदेशात सूर्यफूल वगळता सोयाबीन, पामोलिन तेलांच्या किमती सुमारे 100 डॉलरने कमी झाल्या आहेत, अशी माहिती बाजार सूत्रांनी दिली. देशातील आयात चढ्या भावाने कमी झाली असून देशी तेलाने (सोयाबीन, भुईमूग, बिनोला आणि मोहरी) स्थानिक मागणी पूर्ण केली जात आहे.
मोहरीचे मोठ्या प्रमाणात शुद्धीकरण
उत्तर भारतातील हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहरीचे शुद्धीकरण(Refined) केले जात आहे, मात्र या तेलांसह आयात केलेल्या तेलांचा तुटवडा भरून काढण्यासही मर्यादा असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे आगामी काळात मोहरीसारख्या तेलबियांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. खाद्यतेलाच्या पुरवठ्याच्या अडचणी टाळण्यासाठी आगामी काळात सरकारी खरेदी संस्थांनी मोहरीसारख्या तेलबियांचा साठा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.यामध्ये सर्वात जास्त दबाव मोहरीवर आहे, जो आयात केलेल्या तेलांपेक्षा खूपच स्वस्त झाले आहे. आयात तेलांची मागणीही समप्रमाणात नाही, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये आयात सुमारे 13 टक्क्यांनी घटली आहे.
बाजारात घसरणीचे सत्र
इंडोनेशियाने निर्यात खुली केल्याने गेल्या आठवड्यात देशभरातील तेल आणि तेलबिया बाजारात घसरणीचे सत्र दिसून आले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मोहरीचे भाव 100 रुपयांनी घसरून गेल्या आठवड्यात प्रतिक्विंटल 7,515-7,565 रुपयांवर बंद झाले, अशी माहिती बाजार सूत्रांनी दिली. बाजाराचा आढावा घेतला असता आठवड्याच्या शेवटी मोहरी दादरी तेल 250 रुपयांनी घसरले , ते 15,050 रुपये प्रति क्विंटलवर बंद झाले. त्याचबरोबर मोहरी पक्की घानी आणि कच्च्या घानी तेलाचे दरही प्रत्येकी 40 रुपयांनी घटीसह अनुक्रमे 2,365-2,445 रुपये आणि 2,405-2,515 टिन (15 किलो) रुपयांवर बंद झाले. सोयाबीन दिल्लीचा घाऊक भाव 400 रुपये, सोयाबीन इंदूर 500 रुपयांनी घसरून 16 हजार रुपये आणि सोयाबीनचा दर 300 रुपयांनी घसरून 15 हजार 250 रुपयांवर बंद झाला.