Small Saving Scheme : या खातेदारांच्या झोळीत आनंद! इतर बचतकर्त्यांना केंद्र सरकारचा झटका
Small Saving Scheme : नागरिकांना बचतीची सवय लागण्यासाठी केंद्र सरकार गेल्या अनेक दशकांपासून प्रोत्साहन देत आहे. पण गेल्या काही वर्षांपासून व्याजदर वाढत नसल्याने गुंतवणूकदार नाराज आहेत. आताही त्यांच्या पदरात निराशाच पडली आहे. कारण केंद्र सरकारने केवळ याच बचत योजनेवर व्याज वाढवले आहे. कोणती आहे ही योजना?
नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकार बचत करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देते. त्यासाठी पोस्टाद्वारे अनेक अल्पबचत योजना (Small Saving Scheme) चालविल्या जातात. या योजनांमध्ये फसगत होत नाही. व्याज मिळते आणि जोखीम होत नसल्याने अनेक नागरिक या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. गेल्या काही दिवसांपासून या योजनांवर व्याजदर वाढविण्यात येईल अशी अपेक्षा होती. पण केंद्र सरकारने अनेक योजनांवर व्याजदरात मोठी वाढ केलेली नव्हती. त्यामुळे गुंतवणूकदार नाराज होते. आता ही त्यांच्या पदरात निराशच पडली आहे. कारण केंद्र सरकारने केवळे एका अल्पबचत योजनेवर व्याजदर (Interest Rate) वाढवले आहे. या योजनेवरच केंद्र सरकार मेहरबान झाले आहे.
या योजनेवर वाढले व्याजदर
केंद्र सरकारने डिसेंबर तिमाहीसाठी व्याजदर वाढवले आहे. त्यामध्ये पाच वर्षांसाठीच्या आवर्ती ठेव योजनेचा (five-year recurring deposit scheme) समावेश आहे. या योजनेवर पूर्वी 6.5 टक्के व्याज होते. त्यात वाढ करुन 6.7 टक्के करण्यात आले आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने याविषयीची घोषणा केली. इतर अल्पबचत योजनांवर केंद्र सरकारने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. केंद्रीय अर्थखात्याने (Finance Ministry) याविषयीचे परिपत्रक काढले आहे. बचत खात्यावर वार्षिक 4 टक्क्यांचा व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.
पीपीएफमध्ये वाढले का व्याजदर
लोकप्रिय पीपीएफ (PPF) सह इतर कोणत्याही अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केंद्रीय अर्थमंत्रालयाने शुक्रवारी परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यात एका वर्षांच्या बचतीवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यावर 6.9 टक्के व्याज मिळेल. दोन आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी रक्कमेवर 7 टक्के व्याज तर पाच वर्षांच्या बचतीवर 7.5 टक्के व्याज मिळेल.
सुकन्या समृद्धी योजना
मुलींच्या भविष्यासाठी लोकप्रिय सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. या योजनेवर 8 टक्के व्याज देण्यात येत आहे. केंद्र सरकार दर तिमाहीत व्याजदराचा आढावा घेते. या अल्पबचत योजना टपाल खात्यामार्फत चालविल्या जातात. या योजनांवर व्याजदर निश्चित करण्यात येते.
या योजनांवर असे आहे व्याजदर
ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर (SCSS) 8.2 टक्के व्याज मिळते. मासिक बचत योजनेवर (MIS) 7.4 टक्के व्याज मिळते. तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेवर (NSC) 7.7 टक्के व्याज मिळते. सार्वजनिक भविष्य निधीत (PPF) 7.1 टक्के व्याज मिळते. किसान विकास पत्रावर (KVP) 7.5 टक्के व्याज मिळते. ही योजना 115 महिन्यात पूर्ण होते.