सतत व्हॉट्सॲप डीपी बदलताय? मग जाणून घ्या तुमचा स्वभाव कसा आहे?
कोणताही व्यक्ती व्हॉट्सॲपवर आपला डीपी ठेवताना काही बाबींचा विचार करतो. काही जण देवांचे फोटो, पती, पत्नी, मुलांचा फोटो डीपी ठेवतात. तर काही जण निसर्ग, स्फूर्तिस्थाने, चित्र किंवा एखादी कला यांचे फोटो ठेवतात. व्हॉट्सॲप डीपीसोबत कधी कधी स्टेटसही विचारात घेतले जाते.
मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | आपल्या आयुष्यात अनेक महत्वाच्या घटना घडत असतात. त्या घटनांची नोंद कॅमेऱ्यात कैद करणे कुणाला आवडत नाही? अगदी लहान मुलाच्या बारशापासून ते अगदी लहान लहान घटना, प्रवासाची भटकंती, महत्वाचे क्षण कॅमेऱ्यात टिपत असू. आता कॅमेऱ्याची जागा मोबाईलने घेतली. हायटेक मोबाईल आले, सोबत कॅमेरा आला आणि नवे फिचरही आले. त्यात सर्वाधिक लोकप्रिय झाले ते व्हॉट्सॲप. फोटो, व्हीडीओ पाठविण्यासाठी हे फिचर फारच उपयुक्त ठरले. व्हॉट्सॲपमध्ये डीपी आणि स्टेटस हे फीचर्स महत्वाचे. याच व्हॉट्सॲप डीपी सतत बदलणाऱ्या आणि न बदलणाऱ्या व्यक्तिचा स्वभाव कसा असतो? हे जाणून घेऊ..
व्हॉट्सॲपवर एकदा डीपी ठेवला तर काही जण तो सहसा बदलत नाहीत. जोपर्यंत कुणी आपला डीपी बदलत नाही तोपर्यंत तो तसाच राहतो. जे कुणीही कधीही पाहू शकतात. पण, व्हॉट्सॲप स्टेटस हे फक्त २४ तासांसाठीच उपलब्ध असते.
व्हॉट्सॲपवर डीपी का ठेवतो?
कोणीही व्यक्ती व्हॉट्सॲपवर डीपी ठेवण्यामागे एक कारण आहे. कारण त्या व्यक्तीला व्यक्त व्हायचे असते. मग त्यासाठी तो डीपी तसा ठेवतो. निसर्ग किंवा प्राणी, पक्षी ज्यांच्या डीपीवर दिसतात ते निसर्गप्रेमी असतात. ज्यांच्या डीपीवर देव, देवता दिसतात ते भक्ती संप्रदायातील. तर जे पती, पत्नी, मुले, आई वडील यांचे फोटो डीपीवर ठेवतात ते कुटुंबवत्सल असतात.
व्हॉट्सॲप डीपी हे त्या त्या व्यक्तीची आवड निवड किंवा प्रोफाइल दर्शवत असते. लोकांनी मला अमुक प्रकारे ओळखावे हा त्यांचा प्रयत्न असतो, अशी माणसे बहुदा बहिर्मुख असतात. मी आता कसा आहे?, माझी सध्याची स्थिती कशी आहे हे त्यामधून दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
डीपी नसेल तर…
ज्या व्यक्तीने व्हॉट्सॲपवर डीपी ठेवला नसेल तर ती व्यक्ती अंतर्मुख आहे असे समजावे. ती व्यक्ती आपली ओळख लपवून ठेण्याचा प्रयत्न करत असते. डीपीही नाही आणि स्टेटसही अपडेट नसेल तर नक्कीच ती व्यक्ती स्वतःची, कुटुंबाची गोपनीयता जपत आहे असे समजावे.
मात्र, ही व्यक्ती आपले नातेसंबंध कसोशीने जपणारी असते. दुसऱ्याचे डीपी ती आवर्जून पाहते. पण, त्यावर सहसा ती व्यक्त होत नाही. कदाचित ती व्यक्ती व्हॉट्सॲपवर ठराविक वेळेत येऊन मेसेज वाचून शांतपणे मोबाईल बंद करणारीही असू शकते.
वारंवार व्हॉट्सॲप डीपी बदलणारे
या व्यक्ती मूडी, हौशी स्वभावाच्या असतात. नेहमी active असतात. आपण Active आहोत हे दाखविण्यासाठी ते वारंवार स्वतःचे डीपी बदलतात. पण, कधी कधी खूप नैराश्यात गेलेले लोकही सतत डीपी बदलत असतात. जगासमोर खोटा मुखवटा दाखविण्यासाठीच त्यांचा हा खटाटोप असतो.