SIP : ‘फिर्क को धुएं’ मध्ये उडवता कशाला, सिगारेट सोडून व्हा करोडपती!
SIP : सिगारेटचा धूर तुमच्या आरोग्याला आणि खिशाला हानीकारक असतो. तुम्ही दिवसाकाठी सिगारेटवरील 100 रुपये वाचवले तर काही वर्षानंतर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.
नवी दिल्ली : सध्याच्या काळात कोट्यधीश व्हायला कोणाला नाही आवडणार. आपल्याकडे खूप पैसा यावा आणि तो सातत्याने यावा ही प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही तुमच्या सवयींना वेळीच आवर घातली आणि नियोजन केले तर श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणी ही रोखू शकणार नाही. सिगारेटचं (Cigarette) व्यसन तुमच्या आरोग्याला आणि खिशाला हानीकारक असते. ही गोष्ट सिगारेट पिणाऱ्याला चांगलीच (Smoking Habits) ठाऊक असते. त्याने जर वेळीच सिगारेट सोडून हा खर्च म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) गुंतवल्यास मोठा फायदा होईल. त्यासाठी मनाचा हिय्या करत सिगारेट चुरगाळून फेकून द्यावी लागेल. तुम्ही दिवसाकाठी सिगारेटवरील 100 रुपये वाचवले तर काही वर्षानंतर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.
दिवसाकाठी किती ओढता सिगारेट तुम्ही एका दिवशी जर 5 सिगारेट ओढत असाल तर साधारणता त्यावरील खर्च 100 रुपये होईल. एका महिन्यात, 30 दिवसांत एकूण सिगारेटवरील खर्च 3000 रुपयांच्या घरात पोहचेल. तीन हजार रुपये ही मोठी रक्कम आहे. हा खर्च वेळीच योग्य म्युच्युअल फंडात गुंतवल्यास तुम्हाला श्रीमंत होता येईल.
सलग करा गुंतवणूक जर तुम्ही सलग 30 वर्षांसाठी एखाद्या म्युच्युअल फंडात दर महिन्याला 3000 रुपयांची SIP सुरु केली तर त्याचा फायदा दिसून येईल. साधारणतः 12 टक्के वार्षिक परतावा गृहित धरला तरी तुम्हाला 1.1 कोटी रुपये मिळू शकतात. यामध्ये महागाईचा विचार करण्यात आलेला नाही.गुंतवणूकदाराने दरमहा तीन हजार रुपये गुंतवणूक केल्यास तो 10.8 लाख रुपये गुंतवणूक करेल. त्यावर 95.1 लाख रुपयांचा नफा मिळेल. एकूण जवळपास 11 लाख रुपयांची रक्कम त्यात जमा केल्यास तुमच्याकडे एकूण 1.1 कोटी रुपये असतील.
तर मिळेल जोरदार परतावा जर तुम्हाला अधिकचा परतावा हवा असेल तर, तुम्ही ही रक्कम वाढवू शकता. तुम्ही 30 वर्षाऐवजी 35 वर्षांकरीता दर महा 3000 रुपये जमा करु शकता. ही रक्कम 1.9 कोटी रुपयांपर्यंत पोहचेल. म्हणजे गुंतवणूकदाराने केवळ 12.6 लाख रुपये हप्त्याने जमा केल्यास 35 वर्षांनी त्याला आणखी मोठा परतावा मिळेल.
चक्रवाढ व्याजाचा फायदा जर तुम्ही दरमहा गुंतवणूक वाढवली तर तुमची रक्कम वाढले. त्यावरील व्याज वाढेल. व्याजाचा दर जरी 12 टक्के गृहित धरला असला तरी, एखादी स्कीम तुम्हाला 15 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकेल. त्यानुसार तुम्हाला परतावा ही चांगला मिळेल. 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास वार्षिक 12 टक्के परताव्यानुसार तुमची रक्कम 3.2 कोटी रुपयांपर्यंत होईल. म्हणजे गुंतवणूकदाराला जमा रक्कमेवर 3 कोटी रुपयांचा फायदा होईल.
कम्पाऊंडिंगचा लाभ दीर्घकालीन गुंतवणुकीत SIP केल्यास त्याचा मोठा फायदा होतो. एसआयपीत तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक कराल त्याचा चांगला लाभ मिळतो. एसआयपीवर बाजारातील घडामोडींचा प्रभाव पडतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी, चांगला म्युच्युअल फंडाची निवड करणे आवश्यक असते. त्यासाठी बाजारातील तज्ज्ञाची मदत जरुर घ्या.