डेबिट कार्ड बंद पडलंय? घाबरू नका, नवीन कार्ड घरबसल्या मिळवा !
तुमचं डेबिट कार्ड खराब झालं असेल, तर घाबरू नका. यापैकी कोणताही एक पर्याय निवडा आणि अगदी सहजपणे घरबसल्या नवीन कार्ड मागवा. यामुळे तुम्हाला बँकेच्या रांगेत उभं राहण्याची गरज नाही.

तुमचं बँकेत खाते आहे? मग नक्कीच डेबिट कार्डही वापरत असाल. आजकाल तर प्रत्येकाच्या खिशात एकतरी डेबिट कार्ड असतंच.पण ते सतत वापरल्यामुळे कधी कधी झिजतं, वाकतं, काम करणं थांबतं किंवा एटीएममध्येही रिड होत नाही. अशा वेळी घाबरण्याएवजी किंवा बँकेत धावपळ करण्याऐवजी, नवीन कार्ड घरबसल्या मागवता येतं तेही घरबसल्या आणि अगदी सहज! चला, बघूया नवीन डेबिट कार्ड घरबसल्या मिळवण्यासाठी कोणते सोपे पर्याय उपलब्ध आहेत ते पाहू.
1. नेट बँकिंगद्वारे नवीन कार्डसाठी अर्ज करा
जर तुमचं डेबिट कार्ड खराब झालं असेल, तर तुम्ही नेट बँकिंगद्वारे त्याचं रिप्लेसमेंट करू शकता. हा सर्वात सोपा आणि जलद मार्ग आहे. यासाठी तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉगिन करा. तिथे “डेबिट कार्ड” विभागात जाऊन रिप्लेसमेंटचा पर्याय निवडा. त्यानंतर कार्ड पाठवण्याचा पत्ता निवडा. रिक्वेस्ट दिल्यानंतर काही दिवसांत बँक नवीन कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवेल.
2. मोबाईल बँकिंग अॅपचा वापर करा
नेट बँकिंगऐवजी जर तुम्ही मोबाईल अॅपचा अधिक वापर करत असाल, तर बँकेच्या मोबाईल बँकिंग अॅपद्वारेही नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज करता येतो. अॅपमध्ये लॉगिन करून “डेबिट कार्ड” विभागात जा आणि रिप्लेसमेंटसाठी रिक्वेस्ट सबमिट करा. बँक ती प्रक्रिया करून कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवेल.
3. बँकेच्या शाखेत जाऊन नवीन कार्ड मिळवा
जर तुम्ही ऑनलाइन सेवा वापरत नसाल, तर तुम्ही थेट जवळच्या बँक शाखेत जाऊन नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज करू शकता. शाखेत रिलेशनशिप मॅनेजरशी संपर्क साधा आणि आवश्यक फॉर्म भरून द्या. काही बँका तात्काळ कार्ड देतात (यावर तुमचं नाव नसेल), पण नावासह कार्ड हवं असल्यास ते काही दिवसांत पोस्टाद्वारे तुमच्या पत्त्यावर पाठवलं जातं.
4. कस्टमर केअरशी संपर्क साधा
तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरवर कॉल करूनसुद्धा तुम्ही कार्ड रिप्लेसमेंटसाठी रिक्वेस्ट करू शकता. कस्टमर केअर एजंट तुमची माहिती घेऊन रिक्वेस्ट प्रोसेस करेल आणि कार्ड लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल.
डेबिट कार्ड बदलण्यासाठी शुल्क लागतं का?
काही बँका नवीन डेबिट कार्डसाठी किरकोळ शुल्क आकारतात. हे शुल्क तुमच्या खात्यातून आपोआप वजा केलं जातं.