चलनातील 500, 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये दुपटीने वाढ; ‘अशी’ ओळखा खरी-खोटी नोट
आरबीआयच्या एका रिपोर्टनुसार गेल्या वर्षभरात चलनात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. तर दोन हजार रुपयांच्या नोटाचे प्रमाण दीडपटीने वाढले आहे.
नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नुकताच एक अहवाल (RBI report) सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार गेल्या एका वर्षात चलनात असलेल्या बनावट पाचशे रुपयांच्या नोटांची (Fake notes) संख्या दुप्पट झाली आहे. तर दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा देखील दीडपटीने वाढल्या आहेत. आरबीआयने आपल्या अहवालामध्ये (report) म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये चलनात असलेल्या खोट्या नोटांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये चलनात असलेल्या 500 रुपयांच्या खोट्या नोटांमध्ये 102 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर 2000 रुपयांच्या नोटांमध्ये 54 टक्क्यांची वाढ झाली आहे. चलनात असलेल्या दहा रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 16.4 टक्के, 20 रुपयांच्या नोटांची संख्या 16.5 टक्के तर 200 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 11.7 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र दुसरीकडे 50 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटांचे चलनातील प्रमाण घटले आहे.
चलनात सर्वाधिक 500 रुपयांच्या नोटांचा समावेश
किमतीच्या आधारे चलनात पाचशे आणि दोन हजार रुपयांचा हिस्सा हा 87.1 टक्के इतका आहे. हा रिपोर्ट 31 मार्च 2022 च्या आकडेवारीवर आधारित आहे. 31 मार्च 2022 रोजी एकूण चलनात पाचशे आणि हजार रुपयांचा हिस्सा हा 87.1 टक्का इतका होता. यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटाचा हिस्सा सर्वाधिक म्हणजेच 34.9 टक्के इतका आहे. त्यानंतर दहा रुपयांच्या नोटांचा नंबर लागतो. दहा रुपायांच्या नोटाचा चलनातील हिस्सा 21.3 टक्के इतका आहे. चलनात पचशे रुपयांच्या बनावट नोटांची संख्या दुपटीने वाढल्याने आरबीआयच्या चिंतेत भर पडली आहे.
अशी ओळखा खरी नोट
भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने पाचशे रुपयांची खरी नोट कशी ओळखावी याबाबत गाईडलाईन्स जारी केली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार 500 रुपयांच्या नोटेला तुम्ही सरळ पाहिल्यानंतर तुम्हाला देवनागरी भाषेत 500 हा आकडा दिसेल. याशिवाय तुम्हाला मध्यभागी महात्मा गांधी यांचे चित्र दिसेल. त्यामध्ये तुम्हाला सुक्ष्म अक्षरात भारत आणि इंडिया असे लिहिलेले दिसेल. भारत आणि इंडिया जिथे लिहिले आहे, तिथेच तुम्हाला एक सिक्योरिटी थ्रेड दिसेल, तो नोट सरळ धरल्यानंतर हिरवा दिसतो, मात्र तुम्ही नोट टिल्ट केल्यावर या सिक्युरिटी थ्रेडचा रंग हा हिरवा दिसेल या सर्व गोष्टींवरू तुम्ही तुमची नोट खोटी आहे की खरी हे तपासू शकतात.