खाद्यतेलाच्या दरात एका वर्षात 40 टक्के वाढ; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
Edible oil | मोहरीचे तेल सोया तेलापेक्षा थोडे स्वस्त आहे आणि त्याच्या किमतीत 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या बाजारात एक किलो मोहरीच्या तेलाची किंमत एक वर्षापूर्वी 129.19 रुपयांच्या तुलनेत 184.43 रुपये आहे.
नवी दिल्ली: सध्याच्या घडीला देशभरात जवळपास प्रत्येक खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अन्न व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 6 ऑक्टोबर रोजी सोया तेलाची सरासरी किंमत 154.95 रुपये होती. गेल्यावर्षीच्या 106 रुपये प्रति लिटरच्या किमतीपेक्षा या वर्षीचा दर 46.15 टक्के अधिक आहे. म्हणजेच एका वर्षात ग्राहकांना सोया तेलावर 46 टक्के अधिक खर्च करावा लागतो. जवळजवळ सर्व तेलांच्या बाबतीतही हेच आहे.
मोहरीचे तेल सोया तेलापेक्षा थोडे स्वस्त आहे आणि त्याच्या किमतीत 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या बाजारात एक किलो मोहरीच्या तेलाची किंमत एक वर्षापूर्वी 129.19 रुपयांच्या तुलनेत 184.43 रुपये आहे. वनस्पती तेलाच्या किमतीत 43 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. सध्या त्याची किंमत 136.74 रुपये प्रति किलो आहे, तर एक वर्षापूर्वी हा दर 95.5 रुपये प्रति किलो होता.
सूर्य़फुलाच्या तेलाच्या किमतीत 38.48 टक्के वाढ दिसून आली आहे. हा किरकोळ विक्रीचा आकडा आहे. 9 ऑक्टोबर रोजी एक किलो सूर्यफूल तेलाची किंमत 170.09 रुपये होती. जी एक वर्षापूर्वी 122.82 रुपये होती. पामतेलाच्या किमतीत 38% ची वाढ दिसून आली आहे. एक वर्षापूर्वी पाम तेलाची किंमत प्रति किलो 95.68 रुपये होती. ती आज वाढून 132.06 रुपये झाली आहे. भारत खाद्यतेलाच्या एकूण वापरापैकी 60% आयात करतो.
केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
देशांतर्गत बाजारात किंमती कमी करण्यासाठी सरकारने रविवारी खाद्यतेलांच्या व्यापाऱ्यांवर 31 मार्चपर्यंत साठा किंवा साठवण मर्यादा घातली. मात्र, काही आयात-निर्यातदारांना यातून सूट देण्यात आली आहे. 8 ऑक्टोबरपासून एनसीडीईएक्स प्लॅटफॉर्मवर मोहरीच्या तेलाच्या वायदा व्यवहारावर आधीच बंदी घालण्यात आली आहे. सर्व राज्यांना जारी केलेल्या आदेशानुसार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश उपलब्ध साठा आणि वापराच्या आधारावर खाद्यतेल आणि तेलबियांची साठवण मर्यादा ठरवतील. तथापि, काही आयातदार आणि निर्यातदारांना स्टॉक मर्यादेपासून सूट देण्यात आली आहे.
जर एखाद्या कंपनी किंवा व्यापाऱ्याकडे स्टॉक मर्यादेपेक्षा जास्त तेल-तेलबिया असतील, तर त्याची माहिती केंद्र सरकारच्या https://evegoils.nic.in/EOSP/login या पोर्टलवर द्यावी लागेल. हे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे पोर्टल आहे. कोणत्याही व्यापारी किंवा कंपनीला तेल आणि तेलबिया साठा मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्याची परवानगी नाही. राज्यांना त्यांच्याकडे असलेल्या तेल आणि तेलबियांच्या साठ्याबद्दल केंद्र सरकारच्या पोर्टलवर अद्ययावत ठेवण्यास सांगितले आहे.
संबंधित बातम्या:
भेसळयुक्त खाद्यतेल ओळखण्यासाठी FSSAI सांगितली खास ट्रिक, जाणून घ्या याबद्दल सविस्तर!
Healthy Cooking Oil | जेवणासाठी कोणते खाद्य तेल सुरक्षित? वाचा खाद्यतेलांचे फायदे-तोटे