Income Tax : ‘आयटीआर फाईल करा, कर नंतर भरा’, योजना आहे तरी काय..
Income Tax : खरेदीदारांमध्ये बाय नाऊ पे लेटर' ही योजना लोकप्रिय आहे. आयकर खात्याच्या 'आयटीआर आता फाईल करा, कर नंतर भरा', या योजने विषयी करदात्यांमध्ये अशीच उत्सुकता आहे. काय आहे ही योजना..
नवी दिल्ली | 22 ऑगस्ट 2023 : आतापर्यंत ई-कॉमर्स वेबसाईटवर खरेदीदारांमध्ये ‘बाय नाऊ पे लेटर’ ही योजना लोकप्रिय आहे. आयकर खात्याच्या ‘आयटीआर आता फाईल करा, कर नंतर भरा’ ( File ITR Now and Pay Later) या योजने विषयी करदात्यांमध्ये अशीच उत्सुकता आहे. या नवीन फीचरमुळे कोणत्याही करदात्याला सहज आयटीआर फाईल करता येईल, असा दावा करण्यात येत आहे. सध्याच्या व्यवस्थेत एखादी व्यक्ती आयटीआर फाईल करणार असेल तर त्याला कर भरावा लागतो. पण आता तो कराचा तात्काळ भरणा न करता आयटीआर फाईल करु शकणार आहे. या नवीन योजनेतंर्गत आयटीआर दाखल केल्यानंतर करदात्यांना काही अटी व शर्तींसह काही दिवसानंतर कराचा भरणा करु शकतील. त्यामुळे करदात्यांना (Taxpayers) मोठा दिलासा मिळणार आहे.
पर्याय मिळाला
आयकर विभागाने ई-फाइलिंग पोर्टलवर ‘आयटीआर आता फाईल करा, कर नंतर भरा’, ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा उपयोग आगाऊ कर, टीडीएससारख्या पेमेंटसाठी करता येणार नाही. सध्याच्या व्यवस्थेत एखादी व्यक्ती आयटीआर फाईल करणार असेल तर त्याला कर भरावा लागतो. पण आता तो कराचा तात्काळ भरणा न करता आयटीआर फाईल करु शकणार आहे.
पे लेटर योजनेचे नुकसान ?
‘पे लेटर ‘ पर्यायाचा उपयोग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आयटीआर दाखल करताना पे लेटर पर्याय निवडत असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला एक गोष्ट नमुद करावी लागेल. ‘तुम्हाला डिफॉल्ट मानण्यात येऊ शकते’ तसेच उशीरा कर भरल्यास करदात्याला व्याज भरावे लागेल, त्यासाठी तो उत्तरदायी असेल, या दोन अटी त्याला मान्य करावे लागेल. म्हणजे तुम्ही अटी व शर्तींचे उल्लंघन केले, तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
करदात्याला मिळू शकते नोटीस
आयकर विभागाच्या हेल्पडेस्कनुसार, आयटीआर फाईल केल्यानंतर संबंधित करदात्याला एक नोटीस पाठविण्यात येईल. त्यामध्ये तुमचा कराचा भरणा करणे बाकी असल्याचा उल्लेख असेल. तसेच हा कर झटपट भरण्यास सांगण्यात येईल.
किती मिळेल कालावधी
‘पे लेटर ‘ पर्याय निवडला म्हणजे तुम्हाला निवांत कराचा भरणा करता येईल, असे काही डोक्यात असेल तर आताच हा भ्रम दूर करा. आयकर भरण्यासाठी आयकर खाते 30 दिवसांचा कालावधी देते. या कालावधीत दंड वसूल करण्यात येत नाही. पण हा कालावधी संपल्यानंतर दंडात्मक व्याज लागू होते. म्हणजे कराच्या रक्कमेवर व्याज द्यावे लागते.