शाळाप्रवेशापासून आधार-ड्रायव्हींग लायसन्ससाठी आता हे एकच प्रमाणपत्र ग्राह्य
येत्या 1 ऑक्टोबरपासून आधारकार्ड ऐवजी आता सर्व सरकारी प्रमाणपत्रासाठी केवळ एकच प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. पाहा कोणते प्रमाणपत्र लागणार आहे.

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : आता शाळामधील प्रवेश, ड्रायव्हींग लायसन्स, आधार कार्ड किंवा पासपोर्ट यासाठी अर्ज करायचा असेल किंवा मॅरेज रजिस्ट्रेशन करायचे असेल तर वेगवेगळी सरकारी कागदपत्रे जमा करण्याची काहीही गरज राहणार नाही. आता याकामासाठी एकच सिंगल डॉक्युमेंट म्हणून बर्थ सर्टीफिकेट सादर केल्यास ही कामे होणार आहेत. 1 ऑक्टोबर पासून लागू केलेल्या नवीन सुधारित कायद्यानूसार ही सुविधा मिळणार आहे. संसदेच्या मान्सून सत्रात बर्थ एण्ड डेथ रजिस्ट्रेशन ( सुधारित ) अधिनियम 2023 मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 11 ऑगस्ट रोजी दिलेल्या अंतिम मंजूरीनंतर जन्म आणि मृत्यू नोंदणी ( सुधारित ) विधेयक पास झाले होते. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनूसार जन्म आणि मृत्यू नोंदणी ( सुधारित ) विधेयक 2023 च्या कलम 1 च्या उप कलम ( 2) अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करीत केंद्र सरकारला हे सूचित केले आहे की 1 ऑक्टोबर 2023 पासून विधेयकातील तरतूदी लागू होतील.
हा अधिनियम लागू झाल्याने शाळा, कॉलेजातील प्रवेश, ड्रायव्हींग लायसन्स, आधारकार्ड किंवा पासपोर्टसाठी अर्ज करताना तसेच मॅरेज सर्टीफिकेट्ससाठी जन्मदाखला हे एकल प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. या नवीन विधेयकामुळे जन्मदाखल्याचे महत्व वाढणार आहे. तसेच जन्म आणि मृत्यूचा राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील डेटा बेस बनविण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा वाढणार आहेत.
आधार ऐवजी बर्थ सर्टीफिकेटला महत्व
हा कायदा लागू झाल्याने जन्म आणि मृत्यूचे प्रमाणपत्र डीजिटली मिळणार आहे. सध्या जन्मदाखल्याची हार्डकॉपी मिळते. या प्रमाणपत्रांसाठी सरकारी कार्यालयात अनेक आठवडे वाट पाहावी लागते. सध्या आधारकार्डला ओळखपत्र म्हणून सगळीकडे ओळखले जाते. या आधारकार्डलाच इतर कागदपत्र जोडावी लागतात. आता हे काम बर्थ सर्टीफिकेट करेल. जे सगळीकडे मुख्य ओळखपत्र म्हणून सगळीकडे मान्य केले जाईल.