मुंबई – पाच दिवसात 3.20 पैशांनी पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) दरवाढ झाली. तर गॅसची 50 रुपयांनी दरवाढ झाल्याने मोदीजी तुम्ही सांगितलेले कुठे आहेत अच्छे दिन असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) केला आहे. पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर दरावाढ करण्यात आल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. तसेच सुरूवातीला नामांकित दुधाच्या दरात वाढ करण्यात आली. त्यानंतर पेट्रोल डिझेल महाग झाल्याने राष्ट्रवादीकडून मोदींना थेट प्रश्न विचारण्यात आला आहे. मोदीजी कुठे आहेत अच्छे दिन असा प्रश्न विचारण्यात आला आहे. 2014 पुर्वी जनतेला जी आश्वासनं दिली ती पुर्ण करावीत. वाढत्या महागाईन लोक त्रस्त आहेत.
काश्मिर फाईल सारख्या विषयाची अर्थमंत्री चर्चा करतात
2014 मध्ये निवडणुकीमध्ये सबंध देशाला नरेंद्र मोदींनी ‘अच्छे दिन’ चे आश्वासन दिले होते. पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ होत असल्याने खऱ्या अर्थाने देशाच्या नागरिकांवर मोठे आर्थिक संकट आणल्याचे महेश तपासे म्हणाले आहेत. मोदीसाहेबांच्या राज्यांमध्ये केंद्रसरकार कुठलाच आर्थिक बोजा सहन करायला तयार नाही. म्हणून कुठलीही दरवाढ झाली तर ती थेट नागरीकांच्या माथ्यावर मारायची असेच धोरण भाजप सरकारचे आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशातल्या अर्थसंकल्पावर चर्चा होणे अपेक्षित आहे. परंतु काश्मिर फाईल सारख्या विषयाची जेव्हा अर्थमंत्री चर्चा करतात. तेव्हा या सरकारचं लक्ष नेमकं कुठे आहे, हे आपल्याला दिसून येते. महागाईने आठ महिन्यांचा उच्चांक गाठलेला असताना देखील मोदी सरकार कुठल्याच प्रकारे नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील नाही. ही वस्तुस्थिती आज जनतेपासून लपलेली नाही अशी टीकाही महेश तपासे यांनी केली.
महत्त्वाच्या शहरातील आजचा पेट्रोल दर
आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 113.35 तर डिझेल 96.70 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 114.17 आणि डिझेल 98.35 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 112.68 तर डिझेल 95.46 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 112.37 आणि 95.13 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 112.22 रुपये लिटर आणि डिझेल 95.02 रुपये लिटर इतके आहे.