मुंबई: देशभरात सुरु असलेली इंधन दरवाढ काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाही. ऐन दिवाळीत पेट्रोल आणि डिझेल दररोज किंमतीचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहेत. अशातच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर ठेऊन नागरिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. तब्बल सात दिवसांच्या दरवाढीनंतर इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत. हे दर आज दिवसभरासाठी लागू असतील. मात्र, इंधन दरवाढीला लागलेला हा ब्रेक तात्पुरता असेल की दीर्घकालीन हे येणारा काळच स्पष्ट करेल.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115. 83 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 106.59 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 110.08 आणि 98.44 रुपये इतका आहे.
गेल्या दीड वर्षांपासून देशासह जगभरात कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने, सर्वच उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मागणी वाढली असून, दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कच्चे तेल महागल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सातत्याने कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल 150 रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल 85 डॉलरच्या आसपास असून, ते येत्या काळात 100 डॉलरवर गेल्यास पेट्रोलची किंमत प्रति लिटर 150 च्या आसपास पोहोचू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
संबंधित बातम्या:
पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने मोदी सरकारची ‘दिवाळी’; सरकारी तिजोरीत 1.71 लाख कोटींची भर
देशातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 120 रुपये तर डिझेल 110 रुपयांपलीकडे; जाणून घ्या कारण
गाडीतील डिझेल संपलंय, पेट्रोल पंपावर जाण्याचीही गरज नाही; ‘ही’ कंपनी करणार होम डिलिव्हरी