Gold Price Today: सोनं स्वस्तात खरेदी करण्याची हीच उत्तम संधी, जाणून घ्या आजचा भाव
Gold Rates | मात्र, सोन्याची सध्याची वाटचाल पाहता आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळू शकते. त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी आत्ताच उत्तम संधी असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट मर्यादेत वरखाली होत आहे. सोमवारी बाजार उघडल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. वायदा बाजारात (Multi commodity Excahnge) सोन्याचा प्रतितोळा दर 90 रुपयांनी वाढून 47624 वर पोहोचला. तर चांदीच्या दरात 195 रुपयांची वाढ होऊन तो प्रतिकिलो 67219 रुपयांवर पोहोचला.
गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोने 8576 रुपयांनी स्वस्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात तेजी असून प्रतिऔंस सोन्याचा दर 1,807.23 डॉलर्सवर जाऊन पोहोचला आहे.
मात्र, सोन्याची सध्याची वाटचाल पाहता आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळू शकते. त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी आत्ताच उत्तम संधी असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. कोरोनाचं संकट, लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसारखे नियम यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत आहेत. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF)मध्ये गुंतवणूकदारांनी तब्बल 6,900 कोटी गुंतवल्याची माहिती नुकतीच समोर आली होती.
सोन्याचा रोजचा दर कसा जाणून घ्याल?
तुम्ही घरबसल्याही सोन्याचा रोजचा दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर सोन्याचा दर तुम्हाला कळू शकतो.
डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव 52 हजारांपर्यंत पोहोचणार?
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जाणकारांकडून सोन्याचा दर आणखी खाली आल्यास खरेदीचा सल्ला दिला जात आहे.
सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये सोन्याच्या किंमतीला 46500 रुपयांच्या पातळीवर भक्कम सपोर्ट आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा दर 46,615 इतका होता. त्यामुळे सोन्याचा दर सपोर्ट प्राईसच्या अत्यंत जवळ आहे. या पातळीपर्यं पोहोचल्यानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु करतील. अशातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या:
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका
Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही
सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती
(Gold and Silver rate today price)