Gold investment : वाढत्या महागाईत सोन्यामधील गुंतवणूक फायदेशीर ठरणार?, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
आरबीआयकडून रेपो दरात दोनदा वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेने देखील रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. महागाई नियंत्रणासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून अशी पाऊले उचलण्यात येत आहेत. मात्र या सर्व बदललेल्या परिस्थितीमध्ये सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते का जाणून घेऊयात
मुंबई : आरबीआयनं (RBI) चालू वर्षात दुसऱ्यांदा रेपो दरात (Repo rate) वाढ केली आहे. अमेरिका (America) आणि ब्रिटन सारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेचेही कर्ज महाग होत आहेत. अशावेळी सोन्यात गुंतवणुकीबाबत अनेक प्रश्न निर्माण झालेत. कर्ज महाग झाल्यानं सोनं स्वस्त होणार का? महाग कर्ज झाल्यानंतर सोनंही महाग होणार का? अमेरिकेत व्याज दर वाढल्यापासून आता सोन्याच्या बाजारात अनेक प्रश्न तयार होत आहेत. सर्वसाधारपणे कर्ज महाग झाल्यानंतर बॉण्ड यील्ड वाढते. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी घटते. तसेच कर्जही महाग होतात. मग तरलता कमी होते, त्यामुळे चलनाची किंमत वाढते. मजबूत चलनामुळे वस्तूंचे दरही कमी होतात. मात्र, सोन्याच्या बाबतीत हे मत प्रत्येक वेळी खर ठरलं नाही. 70 च्या दशकात ज्यावेळी अमेरिकेत व्याज दर वाढले होते. त्यावेळी सोनं महाग झाले. तसेच 80 च्या दशकात कर्ज स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव कमी झाले. 2004 ते 2006 दरम्यान अमेरिकेत व्याज दरात एक टक्क्यानं वाढ होऊन पाच टक्के झाले होते, त्यावेळी सोन्याच्या किमतीत 49 टक्क्यांनी वधारल्या होत्या. सध्या डॉलर इंडेक्स दोन दशकांच्या उच्चांकावर आहे. मात्र, तरीही सोन्याचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. गेल्याच महिन्यात सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहचले होते.
सोन्याच्या विक्रीत 67 टक्के वाढ
अमेरिकेत कर्ज महाग झाल्यानंतर तसेच डॉलरमध्ये तेजी आल्यानंतरही सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. अमेरिकेत सोन्याचे नाणे विकणारी यूएस मिंट कंपनीनं मे महिन्यात सोन्यापासून नाणे तयार करून 1.47 लाख औंस सोनं विकलंय. एप्रिल महिन्याची तुलना करता सोन्याच्या विक्रीत 67 टक्के वाढ झालीये आणि मे महिन्यातील विक्री ही 12 वर्षातील सर्वाधिक विक्री आहे. विक्रीची ही आकडेवारी पाहून सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये उत्साह आहे. म्हणूनच तज्ज्ञही दीर्घ कालावधीत सोन्याच्या भाव वाढीची शक्यता वर्तवत आहेत.
सोन्याचे भाव 56 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता
जागतिक महागाई आणि आर्थिक मंदी दीर्घकाळ चालणार असल्यानं सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ होऊ शकते. 2022 च्या शेवटी सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 2070 डॉलर आणि देशात 56 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात, अशी माहिती रेलिगेर कमोडिटीजच्या व्हाईस प्रेसिडंट सुंगधा सचदेव यांनी दिलीये. व्याज दर वाढल्यानं सोन्यातील गुंतवणूक कमी होण्याची शक्यताही बाजारातील जानकार व्यक्त करत आहेत. मात्र, यंदा व्याज दर वाढण्याआधीच बाजारात सोन्याची मोठी विक्री झालीये. परंतु सोन्यात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा.