मुंबई: दीर्घकाळ झालेल्या घसरणीनंतर आता सोन्याचा दर आता पुन्हा वरच्या दिशेने प्रवास करु लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत बरेच चढउतार पाहायला मिळायला आहेत. सोने सध्या गेल्या अनेक महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. जाणकरांच्या सल्ल्यानुसार सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर शुक्रवारी सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत 0.14 टक्क्यांनी वाढून 46,892 रुपये प्रतितोळा या पातळीवर पोहोचली. तर चांदीच्या दरात 0.48 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिलो 60,963 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलर आणि बॉण्ड्सवरील व्याज वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे. आगामी काळातही हा दबाव कायम राहील. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जगातील महागाईचा दर (Inflation Rate) वाढेल. अशा स्थितीत सोन्याची मागणी पुन्हा वाढेल आणि किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढण्याचा ट्रेंड पुन्हा सुरू होऊ शकतो. सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने मागणीही वाढेल आणि किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी सध्याचा काळ अत्यंत योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो.
पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.
दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर
पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
Income Tax: तुम्ही घरामध्ये किती सोनं ठेवू शकता? काय आहे नियम; उल्लंघन झाल्यास आयकर विभागाची कारवाई