Gold price today: सोने आणि चांदीच्या भावात घसरण, एक महिन्याच्या निचांकी स्तरावर
Gold rate | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 2.1 टक्क्यांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतिऔंस 1,787.40 डॉलर्सवर स्थिरावला होता.
मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोमवारी भारतात सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावात सोमवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी सोन्याने सध्या गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढून प्रतितोळा 46,872 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. तर चांदीच्या दरात 0.4 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून प्रतिकिलो चांदीचा दर 63,345 रुपये इतका आहे. गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीमध्ये 0.4 टक्के आणि चांदीच्या किंमतीत 0.9 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 2.1 टक्क्यांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतिऔंस 1,787.40 डॉलर्सवर स्थिरावला होता.
24 कॅरेट सोन्याचा भाव
सोमवारी बाजारपेठ उघडल्यानंतर मुंबईत सोन्याचा प्रतितोळा भाव 47070 रुपये इतका नोंदवण्यात आला. तर दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 50340 रुपये इतका आहे. चेन्नई आणि कोलकाता येथे प्रतितोळा सोन्याचा दर अनुक्रमे 48390 रुपये व 49140 रुपये इतका आहे.
‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.
गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम वॉलेटकडून (PayTm) ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही ‘गुगल पे’वरुन या सोन्याची विक्रीही करू शकता.
दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर
पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
Gold Price: पाच वर्षात सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार, एक तोळा सोन्याचा दर 90 हजारांवर?
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका