आरोग्य विमा कंपन्यांच्या फसवणुकीवर जालीम इलाज, हक्कांविषयी रहा जागरूक, बिनधास्त करा कंपन्यांच्या दाव्याची चिरफाड
आरोग्य विमा कंपन्यांकडून फसवणुकीचे प्रकार अशात अधिक वाढल्याने या कंपन्यांचे पितळ उघडे पाडा. त्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसविण्यासाठी ग्राहकांच्या हातीही मोठे शस्त्र आहे.
अचानक उद्भवलेल्या आरोग्यविषयक संकटात आरोग्य विमा आर्थिक विवंचनेत भर न घालता त्यातून आपली लागलीच सुटका करतो. त्यामुळे आरोग्य विम्याचे सध्याच्या काळात अनन्यसाधारण महत्व अधोरेखित झाले आहे. सर्वसामान्य ग्राहकही आरोग्य विम्याकडे वळले आहेत. असे असले तरी या विमा प्रकारात फसवणुकीचीे प्रमाण (Health Insurance Fraud) ही वाढले आहे. खोट्या जाहिराती, खोटी आश्वासने देऊन ग्राहकांच्या माथी विमा मारायचा आणि निकडीच्या काळात नियमांचा बागुलबुवा दाखवत अल्प क्लेमवरती त्यांची बोळवण करण्याचा धंदा सध्या राजरोजसपणे सुरु आहे. याविषयीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) अशा कंपन्यांवर अंकुश लावण्याची मोहिम सुरु केली आहे. आरोग्य विमामध्ये फसवणुकीचे दोन प्रकार पहायला मिळतात. एक म्हणजे कंपनीने फसविलेले तर दुसरे म्हणजे ग्राहकांनी चुकीची माहिती देऊन फसविलेले. तर ग्राहकांची फसवणूक केलेल्या प्रकाराची आपण माहिती घेऊ.
तक्रार कुठं करायची?
तुम्ही आरोग्य विमा कंपनीच्या सेवेबाबत असमाधानी आहात आणि कंपनीने केलेल्या फसवणुकीचे प्रमाण, सज्जड पुरावे तुमच्याकडे असतील तर तुम्ही थेट IRDAI कडे तक्रार नोंदवू शकता. IRDAI ग्राहकांच्या हितासाठी प्रयत्नरत आहे. त्याचे नियमही त्याच अनुषंगाने तयार करण्यात आले आहे. तक्रार केल्यानंतर संबंधित कंपनीला मर्यादीत कालावधीत या तक्रारीचा निपटारा करावा लागतो.
तक्रार करण्याचा कालावधी?
विमा कंपनीच्या सेवेतील त्रुटीविषयी तुम्हाला कंपनीला ही कळवावे लागते. त्यांच्या सेवेतील कमी लक्षात आणून द्यावी लागते. कंपनीला 15 दिवसांत तुमच्या तक्रारीचा आढावा घेऊन समाधानकारक उत्तर द्यावे लागते. विमा कंपनीने मर्यादीत कालावधीत तुमच्या तक्रारीला प्रतिसाद दिला नाही अथवा समाधानकारक उत्तर दिले नाही तर ग्राहकाला IRDAI कडे तक्रार नोंदविता येते.
कोणती ही आरोग्य विषयक योजना खरेदी करताना डोळे झाकून ती खरेदी करु नका, खोटी अश्वासने, जाहिरातीतील भूलथापांना बळी पडू नका. विमा कर्मचा-याला यासंबंधीची लिखित माहिती मागा. अटी व शर्तींची माहिती समजून घ्या. नंतरच त्यांचा विमा खरेदी करा. त्यातील बारकावे आणि शब्द छल समजून घ्या. ग्राहकांना Complaints@irdai.gov.in या ई-मेल आयडीवर त्यांची तक्रार नोंदविता येईल. येथे ही समाधान न झाल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, राज्य ग्राहक आयोग, केंद्रीय ग्राहक आयोगाकडे तक्रारीचा पाढा वाचता येईल. फसवणुकी विरोधात दाद मागता येईल.
इतर बातम्या:
चांगल्या बँकिंगसाठी Bad Bank : कर्ज वसुलीसाठी नवीन प्रयोग, बँकेची बॅलन्सशीटही सुधारणार
Share Market | गुंतवा बिनधास्त, चांगला परतावा हमखास, या शेअरमधून मिळतील तुम्हाला घसघशीत परतावा