Home Loan : जर इतका असेल पगार तर बिनधास्त खरेदी करा घर, मिळेल फायदाच फायदा
Home Loan : या महागाईच्या काळात घर खरेदी काही सोपी नाही. त्यामुळे अनेक जण भाड्यानं राहणं पसंत करतात. पण एवढा पगार असेल तर पटकन गृह स्वप्न पूर्ण करावं...
नवी दिल्ली : एक बंगला बने न्यारा, हे प्रत्येकाच्या मनातील स्वप्न असतं. चंद्रमौळी का असेना पण स्वतःचे घर असावे असं प्रत्येकाला वाटतं. पण महागाईच्या या काळात घर खरेदी (Buy Home) सोपी नाही. पैशांची जुळवाजळव करणे सोपे काम राहिले नाही. त्यात जर पगार जर कमी असेल आणि उत्पन्नाचे इतर स्त्रोत नसतील तर मात्र घराचं संपूर्ण बजेट कोलमडून पडतं आणि जीवघेणी कसरत सुरु होते. त्यामुळे जर एकाद्या व्यक्तीला इतका पगार (Salary) मिळत असेल, त्याची पगाराची रेंज इतकी असेल तर बिनधास्त घर खरेदी करावे. पण पगार कमी असेल तर अशा व्यक्तीने घर खरेदी करताना काळजीपूर्वक पाऊलं टाकावीत.
ही चूक करु नका घर खरेदी हा भावनिक आणि सामाजिक विषय असतो. आपण मागचा पुढचा विचार न करता, स्वतःचं घर असावं या विचारानं बिनधास्त घर खरेदीसाठी पाऊलं टाकतो. आपली जमा पुंजी डाऊन पेमेंटसाठी खर्ची घालतो. भलं मोठं कर्ज डोईवर घेतो. पण पुढे खर्चाची जुळवाजुळव करताना इतकी ओढताण होते की, कर्त्या पुरुषाची दमछाक होते. घरातील मोठ्या खर्चासाठी वारंवार उसनवारी करावी लागते आणि आर्थिक गर्तेत बाहेर पडणे मुश्कील होते.
घर खरेदी केव्हा करावी नोकरदार वर्गाने ही गोष्ट लक्षात ठेवावी की, घर खरेदीचा खर्च त्यांच्या वेतनाच्या, उत्पन्नाच्या 20 ते 25 टक्क्यांपेक्षा अधिक नसावा. त्यामुळे दर महिन्यातील खर्च आटोक्यात राहिल आणि ईएमआयचा ताण येणार नाही. तुमचा पगार 50 ते 70 हजारांच्या घरात असेल आणि हप्त्यापोटी 25 हजार रुपयांचा खर्च येत असेल, तर तुमच्या हातात मोठी रक्कम उरणार नाही. पण उत्पन्नाचा एखादा स्त्रोत असेल तर गृहकर्ज घेता येईल.
डाऊन पेमेंटची व्यवस्था घर खरेदी करताना जेवढा जास्त रक्कम डाऊन पेमेंटसाठी वापराल. तेवढा अधिक फायदा होतो. त्यामुळे तुमच्यावर ईएमआयचा बोजा वाढत नाही. तसेच मोठी कर्ज रक्कम न घेतल्याने ईएमआय पण कमी होतो. पण अनेकदा कमी डाऊन पेमेंट केल्याने कर्जाची रक्कम वाढते आणि पुढे कर्जाचा हप्ता पण वाढतो. त्याचा दीर्घकाळासाठी फटका बसतो.
नोकरीची शाश्वती तुम्ही सातत्याने नोकरी बदलत असाल तर घर घेताना विचार करा. कारण सातत्याने नोकरी बदलत असाल आणि त्यात वेतनात वाढ होत नसेल तर फटका बसू शकतो. नोकरी निमित्त तुम्ही शहर बदलत असाल, तेव्हा पण घर घेण्यासंबंधीचा विचार करा, कारण दोन दोन शहरातील खर्चाचे ओझे तुमच्या डोईवर असेल.
कमी बजेटचे घर घेण्याचे फायदे तुमचे वेतन जास्त नसेल तर स्वस्तातील घराचा पर्याय निवडणे फायद्याचे ठरु शकते. तुमच्या स्वप्नांना काही वर्षे मुरड घातल्यास तुम्हाला कर्जाचा बोजा जाणवणार नाही आणि हप्ते फेडताना दमछाक होणार नाही.