आजारपणाच्यावेळी खर्चासाठी PF खात्यातील पैसे काढण्याची मुभा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
PF Account | तुम्ही आता आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही.
नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. नोकऱ्या कशाबशा वाचलेले कर्मचारीही वाढीव खर्चामुळे मेटाकुटीस आले आहेत. अशावेळी कोरोना किंवा अन्य कोणत्या आजारामुळे रुग्णालयात दाखल व्हायची वेळ आली तर हा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न उभा राहतो. यासाठी आता भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे.
त्यामुळे तुम्ही आता आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही. केवळ एक विनंतीचा अर्ज सादर करून तुम्ही हे पैसे मिळवू शकता. या अर्जात आजार आणि रुग्णालयाची संपूर्ण माहिती नमूद करावी लागेल. पीएफ खातेधारक स्वत:साठी आणि कुटुंबातील व्यक्तींसाठी पैसे घेऊ शकतो. यापूर्वी रुग्णालयाचे बिल दाखवल्यानंतरच पीएफ खात्यामधून आगाऊ रक्कम काढता येत होती. मात्र, आता केवळ एक अर्ज दिल्यानंतर काही तासांमध्ये तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. या सुविधेमुळे पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया
* सर्वप्रथम www.epfindia.gov.in या संकेतस्थळावर जावे. * संकेतस्थळावर गेल्यानंतर क्लेम (फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी) भरावा. * याठिकाणी आपल्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाकून व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी. * प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेम या पर्यायवर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्यासमोर एक ड्रॉपडाऊन मेन्यू येईल. त्यामध्ये Advacne (Form 31) हा पर्याय निवडावा. * Form 31 भरताना तुम्हाला पैसे काढण्याचे कारण नमूद करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला किती रक्कम हवी आहे, तेदेखील नमूद करावे. तसेच आपल्या बँकेच्या चेकची स्कॅन कॉपी आणि पत्ता फॉर्ममध्ये नमूद करावा. * यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा क्लेम फाईल होईल.
संबंधित बातम्या:
गरज भासल्यास निवृत्ती निधीचा करु शकता वापर, या परिस्थितीत काढू शकता पीएफ खात्यातून पैसे
PF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट
आता यूएएनशिवाय जाणून घ्या पीएफ खात्यातील शिल्लक, ही आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया