LIC शेअर 52 आठवड्यांच्या नीच्चांकी स्तरावर, मार्केट कॅपच्या क्रमवारीत ICICI कडून धोबीपछाड
आयसीआयसीआय बँक आणि एलआयसी इंडिया नंतर एचडीएफसी लिमिटेड (HDFC Limited) 8 व्या आणि भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 9 व्या स्थानावर आहे.
नवी दिल्ली : सर्वाधिक बाजार मूल्याच्या (मार्केट कॅपिटायलेझेशन) कंपन्यांच्या क्रमवारीत भारतीय आयुर्विमा महामंडळाची (Life Insurance Corporation) घसरण झाली आहे. एलआयसी इंडियाच्या मार्केट कॅप मधील घसरणीनंतर कंपनी 6 व्या क्रमांकावरुन 7 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. मार्केट कॅपच्या क्रमवारीत आयसीआयसीआय बँक ही एलआयसीला सरस ठरली आहे. एलआयसीला धोबीपछाड देत सर्वाधिक बाजारमूल्य असणारी देशातील 6 व्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे. आयसीआयसीआय बँक आणि एलआयसी इंडिया नंतर एचडीएफसी लिमिटेड (HDFC Limited) 8 व्या आणि भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 9 व्या स्थानावर आहे. देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांच्या क्रमावारीत रिलायन्स इंडस्ट्रीज अग्रक्रमावर आहे. मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance industries limited) 17,81,838.68 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह देशातील सर्वाधिक भागभांडवल असलेली कंपनी आहे. रिलायन्स नंतर क्रमवारीत दुसरं स्थान टीसीएस(टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) पटकाविलं आहे. मंगळवारी टीसीएसचा मार्केट कॅप 12,31,197.61 कोटी रुपयांसह बंद झाला होता.
बॉम्बे स्टॉक एक्स्जेंचच्या आकडेवारीनुसार,
31 मे रोजी प्रमुख कंपन्यांचे मार्केट कॅप:
- एलआयसी 5,13,273.56 कोटी
- आयसीआयसीआय बँक 5,22,519.50 कोटी
- एचडीएफसी लिमिटेड 4,18,509.55 कोटी
- स्टेट बँक ऑफ इंडिया 4,17,493.33 कोटी
- भारती एअरटेल 3,85,046.03 कोटी
- एलआयसीची नीच्चांकी घसरण
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध (लिस्टेड) झाल्यानंतर एलआयसी शेअर घसरणीनंतर नीच्चांकी पातळीवर पोहोचला. सवलतीसह सूचीबद्ध झाल्यानंतर एनएसई वर एलआयसी शेअर 52 आठवड्यांच्या सर्वात नीच्चांकी स्तरावर 801 रुपये प्रति शेअर वर पोहोचला. एलआयसीच्या प्रति शेअर 949 रुपये इश्यू प्राईसपेक्षा 148 रुपयांनी कमी आहे. आज (बुधवारी)एलआयसीच्या एका शेअरची किंमत 815 रुपयांच्या नजीक आहे.
मार्केट कॅप म्हणजे काय?
“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचं संक्षिप्त स्वरूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 17 लाख कोटींहून अधिक आहे. म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सर्व शेअर्सची एकूण बाजारातली किंमत 10 लाख कोटींपेक्षा अधिक असल्याचा अर्थ ध्वनित होतो.