Mutual Fund Loan : म्युच्युअल फंडावर मिळवा कर्ज, इतकी सोपी आहे प्रक्रिया
Mutual Fund Loan : म्युच्युअल फंड केवळ दरमहिन्याच्या अल्पबचतीतून मोठा निधीच जमा करत नाही. कम्पाऊंडिंग आधारे तुम्हाला दीर्घ काळानंतर जोरदार परतावा मिळतो. पण एवढचा त्याचा वापर नाही. तर गरज पडल्यास या फंडवर तुम्हाला कर्ज ही मिळते.
नवी दिल्ली : म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) नियमीत गुंतवणुकीतून तुम्हाला दीर्घकाळानंतर मोठा निधी जमा करता येतो. त्यावर कम्पाऊंडिंगचा तुम्हाला फायदा मिळतो. दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीनंतर त्यावर जोरदार परतावा मिळतो. अडचणीच्या काळात म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक तुमच्या उपयोगी पडू शकते. बँका, वित्तीय संस्थामध्ये कर्ज (Loan) प्रकरण लगचे मंजूर होते, असे नाही. त्यासाठी प्रक्रिया आणि शुल्क आकारण्यात येते. पण म्युच्युअल फंडाआधारे तुम्हाला लवकर कर्ज मिळते. त्यावर व्याजदरही (Interest Rate) माफक असतो आणि प्रक्रिया शुल्कही (Processing Fees) जास्त लागत नाही.
म्युच्युअल फंडावर कर्ज घेताना, त्याचा कालावधी, त्यावरील व्याज दर हे त्या-त्या बँका आणि वित्तीय संस्थांवर अवलंबून असते. तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आणि इतर मुद्यांवर कर्जाची प्रक्रिया अवलंबून असते. म्युच्युअल फंडात मोठी रक्कम जमा असेल तर जास्त कर्ज मिळू शकते. म्युच्युअल फंडवर कर्ज घेताना बँका, वित्तीय संस्था तुमच्याकडून प्रक्रिया शुल्क (Processing Fees) वसूल करते. तसेच व्याजही घेते. वैयक्तिक गुंतवणूकदार, विदेशी गुंतवणूकदार, कंपनी, हिंदू विभक्त कुटुंब, संस्था आणि अन्य व्यक्ती म्युच्युअल फंडातील बचतीवर कर्ज मिळवू शकतात.
इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुमची एकूण संपत्ती किती आहे, त्याच्या मूल्यावर 50 टक्क्यांपर्यंत कर्ज रक्कम मिळते. तर म्युच्युअल फंडमधील निश्चित कमाईच्या मूल्यावर 70 ते 80 टक्के कर्ज मिळते. त्यामुळे कर्ज मिळविताना त्याचा वापर होतो. इतर कर्जाप्रमाणेच तुम्ही पण म्युच्युअल फंडावर बँका, वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवू शकता. काही बँका तर ऑनलाईन कर्ज मंजूर करतात. त्यासाठी कमी कागदपत्रे लागतात. ऑनलाईन कर्जासाठी अर्ज करावा लागेल. एकदा त्याला मंजूरी मिळाली की काही दिवसात तुमच्या खात्यात रक्कम जमा होते.
वैयक्तिक कर्जापेक्षा म्युच्युअल फंडवरील कर्जावर कमी शुल्क आकारल्या जाते. हे कर्ज इतर कर्जापेक्षा स्वस्त मानण्यात येते. यासाठीचे प्रक्रिया शुल्कही कमी आकारण्यात येते. तर वैयक्तिक कर्जासाठी तुम्हाला जादा प्रक्रिया शुल्क द्यावे लागते. काही बँका प्रक्रिया शुल्क आणि इतर खर्च माफ करते.
हे ठेवा लक्षात
- कर्ज घेतल्यानंतर ते निर्धारीत वेळेत फेडल्यास, म्युच्युअल फंड मॅनेजर त्याबदल्यात फंडचे युनिट परत करतात
- त्यानंतर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील लाभ, लाभांश हे मिळत राहतात
- पण जे युनिट्स तुम्ही बँका, वित्तीय संस्था यांना कर्जासाठी तारण म्हणून ठेवतात. ते विक्री करता येत नाही
- बँका प्रक्रिया शुल्क आणि इतर खर्च माफ करतात
- म्युच्युअल फंडाच्या मूल्यावर 50 टक्क्यांपर्यंत कर्ज रक्कम मिळते