फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताय? वेळीच समजून घ्या धोके, अन्यथा गुंतवलेला पैसा ठरेल डोकेदुखी!
सर्वसाधारणपणे एफडी हा सर्वात गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो परंतु एफडीचे सुद्धा काही वेगवेगळे धोके असतात ज्यामुळे रिटर्न भरतेवेळी आपल्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
मुंबई : आपल्यापैकी अनेक असे जण आहेत जे पैशासंदर्भात कोणतीच रिस्क घेऊ इच्छित नाही. आपल्या पैशांमधील सर्वात मोठा हिस्सा फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) मध्ये गुंतवण्यास पसंती देतात. परंतु अनेकांचे असे म्हणणे आहे की, बँक एफडी (Bank FD) मध्ये कोणत्याच प्रकारची जोखीम म्हणजेच धोका नसतो. तसे पाहायला गेले तर त्यात धोका नसतो मात्र वास्तविकतेमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक (Investment) ही धोकादायकच असते. याचाच अर्थ प्रत्येक गुंतवणुकीमध्ये धोक्याचे वेगवेगळे स्तर असतात. एफडी हा सर्वात कमी धोका असणारा गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. जर तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर यासाठी आधी व्यवस्थित चौकशी करा आणि त्यानंतरच तुमचा पैसा गुंतवा. जेणेकरून भविष्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिटर्न्स मिळू शकतील.
महागाई दरवाढीचा धोका
फिक्स्ड डिपॉजिटवर सर्वात मोठा धोका हा महागाई दराचा असतो. महागाई दरामुळे आपल्या पैश्यांचे मूल्य कमी होते. एफडीचा एक दर ठरलेला असतो आणि एका विशिष्ट दरानेच एफडी आपल्याला विशिष्ट पद्धतीने व्याज देत असते, परंतु जेव्हा महागाई दर वाढतो तेव्हा या व्याजदरावर विपरीत परिणाम पाहायला मिळतो म्हणूनच अनेकांना भविष्यात नुकसान सहन करावे लागते. अश्या वेळी गुंतवणूक करत असताना तज्ज्ञ मंडळींचा सल्ला आवश्य घ्यायला हवा.
व्याजदराशी संबंधित धोके
जेव्हा आपण एफडी काढतो तेव्हा ती जर दीर्घ कालावधी असेल तर त्या एफडीचा आपल्याला फायदा मिळतो म्हणजे जर आपण अनेक वर्षासाठी एखादी एफडी काढून त्यामध्ये पैसा गुंतवला तर त्यावर मिळणारे दर देखील आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळत असते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून दीर्घ कालावधीसाठी गुंतवलेले पैशांच्या व्याजदरावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे धोके देखील पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर एफडी रिटर्न मध्ये मिळणारे दर अन्य पर्यायांपेक्षा खूपच कमी असतात. जर व्याजदर अजून कमी झाले तर आपल्याला मिळणारे रिटर्न सुद्धा खूपच कमी होऊन जाते.
लिक्विडिटीशी निगडित धोका
एफडी आपण कधीही बंद करून पैसे काढू शकतो परंतु जर तुम्ही असे करत असाल तर एफडीचे मिळणारे फायदे तुम्हाला लागू होत नाही. जेव्हा एफडीचा कालावधी पूर्ण होत असतो तेव्हाच आपल्याला आपण ज्या पैशांची गुंतवणूक केलेली असते त्याचा एकंदरीत फायदा प्राप्त होत असतो. जर तुम्हाला तुमच्या एफडी चा पूर्णपणे लाभ हवा असेल तर ती एफडी पूर्णपणे मॅच्युअर होऊ द्या. काही प्रकरणांमध्ये जर तुम्ही वेळेच्या आधी एफडी बंद करत असाल तर तुम्हाला काही प्रमाणामध्ये पेनल्टी फी सुद्धा भरावी लागते. जर तुम्ही तुमची संपूर्ण रक्कम एफडी मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला लिक्विडिटीशी निगडित धोके उद्भवू शकतात. यासाठी अनेकदा सल्ला दिला जातो की, गुंतवणुकीचा काही विशिष्ट हिस्सा अश्या कोणत्या तरी एफ डी मध्ये लावायला हवा जेथे तुम्ही गरजेच्या वेळी तुमचे पैसे परत काढू शकतात.
डिफॉल्टचा धोका
बँकेद्वारे काढण्यात येणाऱ्या एफडीवर सर्वात जास्त धोका बँकेच्या डिफॉल्टचा असतो. तसे पाहायला गेले तर भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे धोके निर्माण होण्याची शक्यता खूपच कमी असतात परंतु काही परिस्थितींमध्ये अशा प्रकारचे धोके जरूर उद्भवू शकतात. डिफॉल्ट ही अशी परिस्थिती आहे ज्यात गुंतवणूकदाराना विशिष्ट रिटर्न देण्याचा वादा केला जातो परंतु बँक ग्राहकांना योग्य परतावा देण्यामध्ये अपयशी ठरते किंवा सरकारद्वारे योग्य ते फंडिंग बँकेला केले जात नाही यामुळे लोकांचे पैसे बुडतात. या धोक्याची पातळी बँकेच्या आपल्या आर्थिक व्यवस्थेवर किंवा गुंतवणूक करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. म्हणूनच अनेकदा प्रत्येक बँकेचे एफडीचे दर वेगवेगळे असतात. खासगी बँका ग्राहकांना जास्त व्याजदर ऑफर करत असतात, परंतु या खासगी बँकांमध्ये पैसा गुंतवणूक करणे धोक्याचे असते. सरकारी बँकांपेक्षा खासगी बँकांमध्ये पैसा गुंतवणे कधीही धोक्याचे ठरते. बहुतेक वेळा बँक बुडण्याच्या कारणांमुळे भारतीय रिझर्व बँक छोट्या-छोट्या प्रायव्हेट म्हणजेच खाजगी बँकांवर जास्त लक्ष देत असते, जेणेकरून ग्राहकांचा पैसा कोणत्याही प्रकारे बुडू नये याची काळजीदेखील रिझर्व बँक ऑफ इंडिया घेत असते.
संबंधित बातम्या
आर्थिक अडचणीमध्ये गुंतवणुकीवर कर्ज घेणे कितपत फायदेशीर?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
तुम्हालाही ऑनलाईन कर्ज हवे आहे? मग ही फिनटेक कंपन्यांची ‘डिजिटल दादागिरी’ एकदा बघाच
RBI Alert : केंद्रीय बँकेच्या नावाने पैसे उकळणारी टोळी सक्रिय, ऑनलाईन फसवणुकीपासून कसे सावध राहाल?