इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची डिजिटल भरारी, उघडली 5 कोटी खाती; देशभरातील 1.36 लाख कार्यालयांतून उद्दिष्ट साध्य
अवघ्या तीन वर्षांत झंझावती वाढ नोंदवत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने देशभरात 5 कोटी खाती उघडली. आर्थात पोस्ट खात्याचा अनुभव आणि विस्तारलेले जाळे, कर्मचारी, अधिकारी यांचे परिश्रम आणि रणनिती यांचा या रेकॉर्डब्रेक कामगिरीमध्ये हात आहे. देशभरातील 1.36 लाख पोस्ट कार्यालयातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.
India Post Payments Bank : टपाल खात्याच्या व्याप्तीचा उत्तम वापर करत, त्यांची ग्रामीण आणि शहरी भागातील जोडलेली नाळ लक्षात घेत, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने देशातील बँकिंग क्षेत्रात डोळे दिपवणारी कामगिरी केली आहे. बँकेने अवघ्या तीन वर्षांत तब्बल 5 कोटी ग्राहकांना जोडले आहे. हा एकप्रकारे रेकॉर्ड आहे. कोणत्याही बँकेला पदार्पणातच एवढा मोठा ग्राहक वर्ग मिळविता येणे केवळ अश्यक आहे. मात्र आयपीपीबीने पोस्ट खात्याचा अनुभव आणि विस्तारलेले जाळे, कर्मचारी, अधिकारी यांचे परिश्रम आणि रणनिती या आधारे ही कामगिरी फत्ते केली. विशेष म्हणजे हा सर्व कार्यक्रम डिजिटल माध्यमातून आणि कागद न वापरता (Paperless) एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांची संख्या पाच कोटींवर पोहोचली आहे, बँकेला देशभरात विस्तारलेल्या 1.36 लाख पोस्ट कार्यालयातून हा पल्ला गाठता आला. अशी घोषणा सोमवारी बँकेने केली. बँकेचा शुभारंभ झाल्यापासून, केवळ तीन वर्षांच्या आत ही देशातील सर्वाधिक जलदगतीने विस्तारलेल्या बँकांपैकी एक बँक ठरली आहे.
ग्रामीण महिलांना अर्थसंजिवनी
आयपीपीबीने आपल्या 1.36 लाख पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून 5 कोटी खाती डिजिटल आणि संपूर्ण कागदरहित उघडली आहे. यातील 1.28 ग्रामीण भागातील टपाल कार्यालयाने खाती उघडण्यात आघाडी घेतली आहे. ग्रामीण भागात त्यांनी बँकिंग सेवा सुरु केली आहे. .या कामगिरीमुळे, आयपीपीबीने जगातील सर्वात मोठी डिजिटल वित्तीय साक्षरता मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली असून, टपाल कार्यालयाच्या 2,80,000 कर्मचाऱ्यांच्या परिश्रम शक्तीच्या बळावर, वित्तीय साक्षरता आणि सक्षमीकरणाची ही मोहीम राबवली आहे. या 5 कोटी खात्यामध्ये सुमारे 48 टक्के महिला खातेदार आहेत, तर 52 टक्के पुरुष खातेदार आहेत, ही आकडेवारी, अधिकाधिक महिलांना बँकिंग क्षेत्रात आणण्याचा बँकेचा उद्देश स्पष्ट करणारी आहे. महिलांच्या एकूण खात्यांपैकी 98 टक्के खाती त्यांच्या घरी जाऊन उघडण्यात आलीत, हे विशेष. 68 टक्के महिलांना या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरणाचे लाभ मिळत असल्याने त्यांना अर्थसंजिवनी मिळाली आहे. आणखी एक मैलाचा दगड म्हणजे देशातील युवक ही पोस्ट पेमेंट बँकेकडे आकर्षित झाले आहेत. आयपीपीबीचे 41 टक्क्यांपेक्षा अधिक खातेधारक १८ ते ३५ वर्षे या वयोगटातील आहेत.
ग्रामीण भागावर विशेष भर
हा बँकेसाठी अभिमानाचा क्षण असून कोविड महामारीच्या काळात बँकेने डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर केला आहे. बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या ग्रामीण नागरिकांची, त्यांना आवश्यक असलेली उत्पादने आणि सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक जे. वेंकटरामू यांनी सांगितले.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार
इंडिया पोस्टअंतर्गत, देशातील सर्वात मोठे वित्तीय सेवांचे जाळे उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरी आणि ग्रामीण भारतातही आमच्या बँकिंग सेवा विस्तारल्या आहेत. केवळ तीन वर्षांत पाच कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची कामगिरी या बँक मॉडेलच्या यशाची पावतीच ठरली आहे. . ग्रामीण भागातील महिलांच्या घरांपर्यंत बँकिंग सेवा पुरवून आम्ही त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे टपाल विभाग सचिव विनीत पांडे यांनी सांगितले.