मुंबईत आता डिझेलची घरपोच डिलिव्हरी, इंडियन ऑईलचे खास अॅप्लिकेशन
Diesel | आगामी काळात पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई आणि सोलापूरमध्ये अशाप्रकारे इंधनाची घरपोच डिलिव्हरी करण्याचे उद्दिष्ट या कंपन्यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे.
मुंबई: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने नुकतीच हमसफर इंडिया आणि ओकारा फ्युलोजिक्स या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. त्यामुळे आता इंडियन ऑईल कंपनीला मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात डिझेलची (Diesel) होम डिलिव्हरी करणे शक्य होईल. ही सेवा सुरु झाली असून ग्राहक आता याचा लाभ घेऊ शकतात.
ओकारा फ्युलोजिक्स ही लॉजिस्टिक कंपनी आहे. हमसफर आणि ओकारा फ्युलोजिक्स या दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये डिझेलची घरपोच डिलिव्हरी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आगामी काळात पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई आणि सोलापूरमध्ये अशाप्रकारे इंधनाची घरपोच डिलिव्हरी करण्याचे उद्दिष्ट या कंपन्यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे.
मुंबईत कुठे-कुठे घरपोच डिझेल मिळणार?
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, जेएनपीटी, पनवेल आणि भिवंडी परिसरात डिझेलची घरपोच डिलिव्हरी केली जाईल. काही दिवसांपूर्वीच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशननेही डिझेलची घरपोच डिलिव्हरी करायला सुरुवात केली होती. मात्र, त्यासाठी ग्राहकांना किमान 20 लीटर डिझेलची ऑर्डर देणे बंधनकारक आहे.
कोणत्या ग्राहकांना फायदा मिळणार?
या नव्या सुविधेतंर्गत ग्राहकांना एका कॅनमधून डिझेल घरपोच केले जाते. रहिवाशी सोसायटी, मॉल, हॉस्पिटल, बँक, कन्स्ट्रक्शन साईट, शेतकरी आणि शैक्षणिक संस्थांना या योजनेमुळे फायदा होऊ शकतो. यापूर्वी जास्त प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्यांनाच ही सेवा उपलब्ध होती. मात्र, आता लहान ग्राहकांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे.
….तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार
त्या काही दिवसांमध्ये खनिज तेलाचे उत्पादन वाढवण्याचे संकेत ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेकडून देण्यात आले आहेत. तसे घडल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होऊन त्याचा थेट फायदा भारताला मिळेल. परिणामी आगामी दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 5 रुपयांनी खाली येऊ शकतात.
संबंधित बातम्या:
देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?
पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…