Indian Railways: आता ट्रेन्स डिझेल नव्हे तर ‘या’ नव्या इंधनावर धावणार, वर्षाला 2.3 कोटींची बचत
Indian Railway | सोनीपत-जिंद मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या इंजिनात आवश्यक ते बदल केले जातील. जेणेकरून या इंजिनांमध्ये डिझेलऐवजी हायड्रोजनचा वापर करता येईल.
मुंबई: भारतीय रेल्वेने सोनीपत-जिंद या 89 किलोमीटरच्या उत्तरेकडील रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी डिझेलऐवजी नवे इंधन वापरण्याचा निर्णय घेतला आहे. आता या मार्गावरील गाड्यांसाठी हायड्रोजन इंधनाचा वापर केला जाईल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास भविष्यात भारतीय रेल्वेच्या इंधनाच्या दरात बरीच कपात होऊ शकते.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोनीपत-जिंद मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या इंजिनात आवश्यक ते बदल केले जातील. जेणेकरून या इंजिनांमध्ये डिझेलऐवजी हायड्रोजनचा वापर करता येईल. त्यामुळे कार्बन उत्सर्जनातही मोठी घट होणार आहे. तसेच रेल्वेच्या इंधनखर्चात दर वर्षाला 2.3 कोटींची बचत होण्याचा अंदाज आहे.
या मार्गांवर नव्या रेल्वे सुरु होणार
पाटणा, बरेली, आणि पाटलीपूत्र या मार्गावर 4 नव्या पॅसेंजर रेल्वे सुरु करण्यात येणार आहेत. 7 ऑगस्टपासून ही नवी रेल्वेसेवा सुरु होईल. तसेच भारतीय रेल्वेकडून तिकीट बुकिंगच्या पद्धतीतही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशी त्यांच्या आवडीची सीट कॅटेगरी निवडू शकतात.
‘या’ राज्यात इंधनटंचाई; दुचाकीस्वारांना 5 लीटर, कारसाठी फक्त 10 लीटर पेट्रोल मिळणार
इंधन दरवाढीमुळे देशातील नागरिक मेटाकुटीला आले असतानाच मिझोराममध्ये एक नवा पेच उद्भवला आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाम आणि मिझोराम (Mizoram) या दोन राज्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे आसाम आणि मिझोराममधील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मिझोरामला जाण्यासाठीचा राष्ट्रीय महामार्ग आसाममधून जातो. मात्र, संघर्षामुळे ही वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी इंधनाचे टँकर मिझोराममध्ये पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे मिझोराममध्ये इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मिझोराम सरकारने राज्यातील सर्व पेट्रोल पंपचालकांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक वाहनासाठी इंधनाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना 5 लीटर आणि चारचाकी वाहनांना फक्त 10 लीटर इंधन मिळत आहे. तर सहा, आठ आणि बारा चाकांच्या अवजड वाहनांना एकावेळी 50 लीटर आणि पिकअप ट्रक्सना एकावेळी फक्त 20 लीटर इंधनाची मर्यादा आखून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
पेट्रोलसाठी खिसा होणार नाही रिकामा, तगड्या मायलेजसह ‘या’ बाईकवर भन्नाट ऑफर
देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?