Insurance Plan : विमा देईल संरक्षण, अशी निवडा योग्य इन्शुरन्स पॉलिसी
Insurance Plan : योग्य विमा संरक्षण तुमचा आर्थिक बोजा कमी करते. अनेक तज्ज्ञ विमा पॉलिसी घेण्याचा सल्ला देतात. रुग्णालयात आरोग्य विमा तर दुसरीकडे जीवन विमा फायदेशीर ठरतो. इतरही अनेक विमा योजना तुमच्या फायद्याच्या ठरतात.
नवी दिल्ली | 15 ऑगस्ट 2023 : प्रत्येक जण आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध जागी गुंतवणूक करतो. प्रत्येकाला निवृत्तीनंतर सर्वात अगोदर आर्थिक सुरक्षा गरजेची असते. काही लोक कोणत्याही चिंतेविना त्यांच्या गरजा विमा योजनेच्या (Insurance Policy) आधारे पूर्ण करतात. तर काही गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन अत्यंत गरजेचे असते. पण खिशावर फार बोजा पडू द्यायचा नसेल तर विमा पॉलिसी केव्हाही मदतीला धावून येऊ शकते. बाजारात अनेक विमा योजनांचे पर्याय उपलब्ध आहे. तुमच्यासाठी योग्य विमा पॉलिसी निवडून तिचा नियमीत हप्ता (Insurance Premium) जमा करणे आवश्यक आहे. योग्य विमा पॉलिसी कशी निवडावी असा प्रश्न अनेकांना पडतो.
कॉर्पोरेट पॉलिसीसह वैयक्तिक आरोग्य विमा योजना आवश्यक
अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी विम्याची सोय करतात. पण त्यात अनेकदा कुटुंबियांचा समावेश नसतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा योजना घेणे आवश्यक आहे. आता आरोग्यावरील खर्च वाढला आहे. औषधोपचारावरच मोठा खर्च होतो. त्यामुळे केवळ कंपनीच्या विमा पॉलिसीवर अवलंबून राहणे फायदेशीर नाही. त्यासाठी वैयक्तिक आरोग्य विमा योजना आवश्यक आहे.
वैयक्तिक आरोग्य विमा कशासाठी आवश्यक
- कमी विमा रक्कम अथवा उपचारासाठी अनेकदा रक्कम पुरत नाही. गंभीर आजारावरील उपचाराचा खर्च अधिक असतो. अशावेळी वैयक्तिक आरोग्य विमा मदतीला येऊ शकतो.
- कंपन्या रुग्णालयात भरती केल्यानंतर एसी-नॉन एसी रुमचे भाडे कमी देतात. ही मर्यादा 5 हजार रुपयांपर्यंत असते. अशावेळी वैयक्तिक विमा पॉलिसी मदतीला येऊ शकते.
- कंपनीच्य विमा पॉलिसीचा लाभ ठराविक रुग्णालयातच मिळतो. एखादे महत्वाचे रुग्णालय या यादीत नसेल तर दुसऱ्या हॉस्पिटलचा मार्ग मोकळा असतो. तेव्हा वैयक्तिक विमा पॉलिसाचा फायदा होतो.
टर्म लाईफ इन्शुरन्स
आता टर्म लाईफ इन्शुरन्सचा प्रकार अधिक वाढला आहे. काही वर्षांसाठी ही विमा योजना काढता येते. यामध्ये एकदाच रक्कम गुंतविता येते. या पॉलिसीत मोठी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते. त्यामुळे विमाधारकाचा मृत्यू ओढावल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक विंवचेनेला सामोरे जावे लागत नाही. 1 कोटी ते 5 कोटी रुपयांपर्यंत कव्हरेज मिळते. विशेष म्हणजे विमा पॉलिसी आणि गुंतवणूक वेगवेगळ्या राहत असल्याने कमी रक्कमेत विम्याचा अधिक लाभ मिळतो. तर योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक चांगला परतावा देते.
हमीपात्र परतावा
बाजारात आता नवीन प्रकारच्या हमीपात्र परतावा देणाऱ्या योजना आल्या आहेत. या पॉलिसी 7 ते 7.5 टक्क्यांपर्यंत परतावा देतात. पारंपारिक गुंतवणूक योजनांपेक्षा हा रिटर्न अधिक आहे. या योजनांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचा वार्षिक प्रीमियम अगदी करमुक्त आहे. जर एखादी व्यक्ती या योजनेत 5 वर्षांकरीता दरमहा 20,000 रुपये गुंतवणूक करत असेल तर तो या योजनेत 12 लाख रुपयांची गुंतवणूक करेल. दहा वर्षांत या योजनेत ही रक्कम 20.5 लाख रुपयांपर्यंत येईल.
युनिट-लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी
युनिट-लिंक्ड इंश्योरेंस पॉलिसी ही त्या गुंतवणूकदारांसाठी आहे, ज्यांना जोखीम नको आहे. ही योजना बाजारावर आधारीत असते. बाजाराने उसळी घेतल्यावर गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळेल. या योजनेतंर्गत कधी कधी 12 ते 15 टक्के रिटर्न मिळतो. याशिवाय ही योजना कर बचतीसाठी मदत करते.