मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दिवसाला 2 रुपये गुंतवा आणि म्हातारपणी मिळवा 36 हजारांची पेन्शन
Modi govt | सरकारची ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. तुमचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुमचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपये असेल तर पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
मुंबई: आयुष्यातील उतारवयात निवृत्ती वेतन हा ज्येष्ठांसाठी प्रमुख आर्थिक आधार मानला जातो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अनेक निवृत्तीवेतन योजना (Pension Scheme) चालवल्या जातात. यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना. या योजनेतंर्गत तुम्ही दिवसाला फक्त 1 रुपया 80 पैसे जमा करुन म्हातारपणी वर्षाला 36 हजारांची पेन्शन मिळवू शकता.
सरकारची ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. तुमचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुमचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपये असेल तर पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या माध्यमातून तुम्हाला म्हातारपणी महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळेल. केंद्र सरकारने 2019 साली ही योजना सुरु केली होती. येत्या पाच वर्षांमध्ये असंघटित क्षेत्रातील 10 कोटी कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा, हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
ही केंद्र सरकारची योजना असल्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतर तुम्हाला महिन्याला 3000 रुपये मिळतील. तुम्ही महिन्याला जितके पैसे जमा कराल तेवढीच पेन्शन भविष्यात तुम्हाला मिळेल.
मात्र, या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. तुमचे मासिक उत्पन्न हे 15000 रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये. तसेच संघटित क्षेत्रातील भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा राज्य कर्मचारी विमा निगम या योजनांचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत पैसे गुंतवता येणार नाहीत.
कोणासाठी आहे ही योजना?
पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत कोणत्याही भारतीय व्यक्तीला पैसे गुंतवता येऊ शकतात. या व्यक्तीचे वय 18 ते 40 इतक्या वयोगटातील हवे. विशेषत: चांभार, शिंपी, रिक्षाचालक, धोबी आणि मजूरवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून ही योजना सुरु करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला देशातील असंघटित क्षेत्रात साधारण 42 कोटी कामगार आहेत.
वयाच्या 18 व्या वर्षापासून महिन्याला 55 रुपये, 29व्या वर्षापासून महिन्याला 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तीने महिन्याला 200 रुपये जमा करणे अपेक्षित आहे. पेन्शन मिळण्यापूर्वी संबधित व्यक्तीचा मृत्यू झाला तर 50 टक्के हिस्सा त्याच्या पती अथवा पत्नीला मिळेल.
योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्ड, जनधन खाते आणि मोबाईल क्रमांक या तीन गोष्टी गरजेच्या आहेत. जीवन विमा निगम (LIC) ची शाखा, राज्य कर्मचारी विमा निगम (ईएसआईसी) किंवा ईपीएफओमध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज भरू शकता.
संबंधित बातम्या:
पेट्रोलसाठी खिसा होणार नाही रिकामा, तगड्या मायलेजसह ‘या’ बाईकवर भन्नाट ऑफर
देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?