Indian Railways: 5 वर्षांच्या मुलांनाही लागू होणार पूर्ण तिकीट ? काय आहेत नियम..
रेल्वे प्रवासादरम्यान 5 वर्षांखालील मुलांसाठीही ट्रेनचे पूर्ण तिकीट विकत घ्यावे लागणार आहे, अशा बातम्या काही दिवसांपासून फिरत आहेत. मुलांच्या प्रवासासाठी रेल्वेचे नियम काय आहेत, ते जाणून घेऊया.
रेल्वे प्रवासादरम्यान 5 वर्षांखालील मुलांसाठीही ट्रेनचे पूर्ण तिकीट विकत घ्यावे लागणार आहे, अशी बातमी सध्या व्हायरल झाली आहे. याबाबत सरकारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (PIB – Press Information Bureau) पडताळणी केली असून या बातम्या चुकीच्या असून त्या भ्रम पसरवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर लहान मुलांच्या तिकीटासंदर्भातील नियमांत (Ticket Rules) कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे भारतीय रेल्वेतर्फेही (Indian Railway) स्पष्ट करण्यात आले आहे. खरंतर, लहान मुलांच्या तिकीटाबद्दल रेल्वेचे नियम स्पष्ट असून त्यांचे तिकीट काढणे वा न काढणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी सीट अथवा बर्थ हवा आहे की नाही, यावर त्यांचे तिकीट काढायचे की नाही, हे अवलंबून असते. जर तुम्हालाही या बातमीबाबत काही संदिग्धता असेल, आणि हे नियम नेमके काय आहेत, हे समजत नसेल तर 5 वर्षांखालील मुलांसाठी रेल्वेचे नियम काय आहेत, ते स्पष्ट जाणून घेऊया
काय आहेत लहान मुलांसाठी तिकीटांचे नियम ?
रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनमध्ये आरक्षित केलेली सीट अथवा बर्थ याचा एकच प्रवासी वापर करु शकतो. मात्र 5 वर्षांखालील मुलांसोबत त्यांचे आई-वडील असणे आवश्यक असते. त्यामुळे आई किंवा वडील त्यांच्या 5 वर्षांखालील पाल्याला घेऊन एकाच सीटवर बसू शकतात, अशी सूट रेल्वेतर्फे देण्यात येते. लहान मुलांसाठ वेगळी सीट मिळत नसल्याने, त्यांचे वेगळे तिकीट घेणेही गरजेचे नसते. मात्र प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी वेगळी सीट हवी , अशी आई-वडीलांची इच्छा असेल, तर ते त्यांच्यासाठी वेगळी सीट अथव बर्थ बूक करू शकतात. अशा वेळी, सामान्य प्रवाशांना लागू होणारे नियमच (लहान मुलांसाठीही) त्यांच्यासाठी लागू होतात. म्हणजेच 5 वर्षांखालील लहान मुलांसाठी वेगळी सीट अथवा बर्थ हवा असेल तर वयस्क नागरिकांच्या तिकीटासाठी लागेल, तेवढीच रक्कम भरावी लागते. 5 वर्षांखालील मुलांचे तिकीट काढणे वा न काढणे हा ऐच्छिक मुद्दा आहे. लहान मुलांसाठी वेगळी सीट बूक केली नसेल तर त्यांचे तिकीट विचारण्यात येत नाही. मात्र जर त्यांच्यासाठी सीट अथवा बर्थ मागितला गेला तर तिकीट काढणे किंवा आधीच जागा आरक्षित करणे, आवश्यक आहे.
PIB Tweet Link
https://twitter.com/PIBFactCheck/status/1559809354857349120
जाणून घ्या नियम
- जर एखादे मूल 5 वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल तर आरक्षित अथवा अनारक्षित कंपार्टमेंटमध्ये तिकीट काढणे हे ऐच्छिक आहे. नियमांनुसार, तिकीट बूक करताना पालकांनी लहान मुलांसाठी जागा आरक्षित केली नाही, तरी संबंधित कॉलममध्ये त्यांची माहिती देणे आवश्यत आहे. रेल्वेकडे ही माहिती नोंद स्वरुपात राहील, मात्र तिकीटाचे शुल्क केवल 5 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांसाठीच आकारले जाईल. मात्र ( 5 वर्षांखालील) लहान मुलांसाठी वेगळी सीट हवी असल्यास तिकीटाचे पूर्ण शुल्क भरावे लागेल. या बर्थ अथवा सीटसाठी बूकिंगपासून त्यावरील सूट, या सर्वांचे नियम लागू होतात.
- जर एखाद्या मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा अधिक आणि 12 वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्यांच्यासाठी तिकीट काढणे बंधनकारक आहे. त्यांच्यासाठी वेगळ्या सीट अथवा बर्थची मागणी (तुम्ही) केली नसल्यास, या वयोगटातील मुलांसाठी, तिकीटाचे निम्मे शुल्क भरावे लागेल. मात्र मुलांसाठी वेगळी सीट अथवा बर्थची मागणी केल्यास, त्याचे पूर्ण शुल्क भरावे लागेल. तसेच जर संपूर्ण ट्रेन सीटिंग असेल ( उदा. शताब्दी किंवा जन शताब्दी) तर 5 ते 12 या वयोगटातील मुलांसाठी सीट घ्यावी लागेल व त्याचे पूर्ण शुल्क भरावे लागेल. जनरल डब्यातून प्रवास करत असल्यास या वयोगटातील मुलांसाठी तिकीटाचे निम्मे शुल्क भरावे लागेल.
- जर तुमचे पाल्य 12 वर्षांपेक्षा अधि वयाचे असेल तर त्याला वयाच्या आधारावर कोणतीही सूट मिळणार नाही. तिकीट बूक करताना प्रौढ व्यक्तीच्या तिकीटासाठी जेवढे शुल्क लागेल, तेवढीच रक्कम भरावी लागेल.