मुंबई: देशात सध्या इंधन, गॅस, खाद्यतेलापासून भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती वाढताना दिसत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत असतानाच आता यामध्ये भर घालणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. 14 वर्षात पहिल्यांदाच काडीपेटीच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे आता काडीपेटीसाठी 2 रुपये मोजावे लागतील. काडीपेटी तयार करणाऱ्या कंपन्यांनी एकत्रपणे हा निर्णय घेतला. यापूर्वी 2007 मध्ये काडीपेटीच्या दरात बदल झाला होता. त्यावेळी त्याची किंमत 50 पैशांनी वाढवून 1 रुपये करण्यात आली होती. आता नवीन दर 1 डिसेंबरपासून लागू होईल.
अलीकडच्या काळात कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे काडीपेटीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उद्योग क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे. काडीपेटी तयार करण्यासाठी 14 वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालाची गरज असते. यातील अनेक घटक असे आहेत की त्यांची किंमत दुप्पट झाली आहे.
रेड फॉस्फरसचा दर 425 रुपयांवरून 810 रुपयांवर पोहोचला आहे. मेणाची किंमत 58 रुपयांवरून 80 रुपये झाली आहे. आऊटर बॉक्स बोर्डची किंमत 36 रुपयांवरून 55 रुपये झाली आहे. इनर बॉक्स बोर्डची किंमत 32 रुपयांवरून 58 रुपये झाली आहे. याशिवाय कागद, स्प्लिंट, पोटॅशियम क्लोरेट, सल्फर सारख्या पदार्थांच्या किमतीतही ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. या सर्व कारणांमुळे दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्पादक सध्या 600 मॅचबॉक्सचे बंडल 270-300 रुपयांना विकत आहेत. एका काडीपेटीत 50 काड्या असतात. आम्ही किंमत 60 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही 430-480 रुपये प्रति बंडल दराने सामान विकू. यामध्ये 12 टक्के जीएसटी आणि वाहतूक खर्चाचा समावेश नसेल, असे उत्पादकांकडून स्पष्ट करण्यात आले.
तामिळनाडूमध्ये आगपेटीच्या व्यवसायात चार लाखांहून अधिक लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे गुंतलेले आहेत. थेट जोडलेल्या लोकांपैकी 90 टक्के फक्त महिला आहेत. इंडस्ट्रीतील लोकांचे म्हणणे आहे की, जेव्हा आम्ही काम करणाऱ्या लोकांना जास्त पगार देतो, तेव्हा त्यांचे आयुष्यही सुधारते. येथे कमी दर मिळत असल्याने या लोकांना आता मनरेगा योजनेत काम करण्यास अधिक रस आहे. मात्र, आता त्यांना जास्त पैसे देणे शक्य होईल, असे उत्पादकांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) तिकीटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन दरवाढीमुळे एसटीला प्रचंड तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकीटाचे दर 17 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्वात महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या संकटात आणखी भर पडणार असल्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:
ITR Filing: पटापट कामं आटोपून घ्या; ‘या’ दिवशी आयकर पोर्टल 12 तास राहणार बंद
तमालपत्राची शेती सुरु करा, काही वर्षांमध्ये व्हाल मालामाल, जाणून घ्या सर्वकाही