Small Schemes : नाही Risk तरी कमाई फिस्क! गुंतवणुकीवर आता जादा फायदा
Small Schemes : अल्पबचत योजना सर्वसामान्यांसाठी हमखास परताव्याचा एक चांगला स्त्रोत आहे. उत्पन्न तर वाढतेच पण बचतीमुळे भविष्यात मोठी रक्कम हाती येते. त्यामुळे पारंपारिकच नाही तर अनेक तरुणही या योजनांकडे आकर्षित होतात. त्यांना केंद्र सरकार लवकरच गिफ्ट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना अधिक फायदा होईल.
नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सुकन्या, पीपीएफ बचत योजनांसह 12 पैकी 9 योजनांमधून अधिक परतावा मिळण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुका लक्षात घेत केंद्र सरकार यामध्ये बदल करु शकते. त्याचा ग्राहकांना मोठा फायदा होऊ शकतो. गेल्यावेळी केंद्र सरकारने 9 योजनांवरील व्याजात एक छदाम पण वाढवला नव्हता. त्यामुळे गुंतवणूकदार नाराज झाले होते. ज्यांना जोखीम न घेता कमाई हवी असते, त्या गुंतवणूकदारांसाठी केंद्र सरकारच्या अल्पबचत योजना फायदेशीर ठरतात. या योजनांमुळे केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात पैसा वापरायला मिळतो. आता अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ (Small Schemes rates for December Quarter to Hike) करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास गुंतवणूकदारांच्या खिशात मोठी रक्कम जमा होईल.
यापूर्वी निराशा पदरात
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जून तिमाहीतील व्याजदराची घोषणा केली होती. त्यात 9 बचत योजनांच्या व्याजदरात कसलीच वाढ झाली नाही. सुकन्या, पीपीएफ योजनांवरील व्याजदरात गेल्या काही तिमाहीपासून छदाम पण वाढविण्यात आलेला नाही. त्यामुळे गुंतवणूकदार नाराज झाले होते. त्यांनी नाराजी जाहीर पण केली होती. आता ही नाराजी दूर होण्याची शक्यता आहे.
या तिमाहीत कधी होणार वाढ
केंद्र सरकार नागरिकांना बचतीसाठी प्रोत्साहन देते. त्यासाठी अल्पबचत योजना राबविण्यात येतात. टपाल खात्याद्वारे या योजना चालविण्यात येतात. केंद्र सरकार 12 प्रकारच्या बचत योजना राबवत आहे. केंद्र सरकार दर तीन महिन्यांना आढावा घेत, या योजनांवर व्याजदर निश्चित करते. पुढील तिमाहीसाठी हे व्याजदर निश्चित असते. ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीसाठी व्याजदरांची घोषणा 30 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
या योजनांवर वाढले होते व्याज
- जुलै-सप्टेंबर तिमाहीत व्याजदर वाढले नाही
- एका वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीमचे व्याजदर 6.8 टक्क्यांहून 6.9 टक्के करण्यात आले.
- 2 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेवर 6.9 ऐवजी 7 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आले.
- 5 वर्षांच्या आवर्ती ठेव योजनेवर 6.2 ऐवजी 6.5 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आले.
या 9 योजनांवर मिळते इतके व्याज
- अल्पबचत ठेव योजनेवर 4.0 टक्के व्याज मिळते
- 3 वर्षे मुदत ठेवीवर सध्या 7 टक्के व्याज देण्यात येते
- 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर जूनपासून 7.5 टक्के व्याज
- ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत सध्या 8.2 टक्के व्याज
- मासिक बचत योजनेवर 7.4 टक्के व्याज मिळते
- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेवर 7.7 टक्के व्याज
- पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेवर सध्या 7.1 टक्के व्याज मिळते
- किसान विकास पत्रावर 7.5 टक्के व्याज
- सुकन्या समृद्धी योजनेवर 8 टक्के व्याजदराने परतावा मिळतो