Petrol Diesel Prices: पेट्रोल-डिझेलच्या किंमती आता कमी होणारच नाहीत, कारण…
Petrol & Diesel | एका बाजूला पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवून मोदी सरकारने काहीसा दिलासा दिला असला तरी इंधनावरील करात कोणत्याही परिस्थितीत कपात होणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेशच केंद्राने दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरवाढीला गेल्या पंधरवड्यात लगाम बसल्याचे चित्र दिसत आहे. कारण, मंगळवारी सलग 17 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, यानिमित्ताने एक वेगळीच शंका उपस्थित केली जात आहे. इंधनाच्या दरवाढीला तुर्तास लगाम बसला असला तरी सामान्य लोकांना अपेक्षित असणारी दरकपात केंद्र सरकारकडून केली जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
एका बाजूला पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवून मोदी सरकारने काहीसा दिलासा दिला असला तरी इंधनावरील करात कोणत्याही परिस्थितीत कपात होणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेशच केंद्राने दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलवर लादण्यात आलेल्या कराच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत चांगलाच महसूल जमा होत आहे. सध्याच्या घडीला भारत हा इंधनावर सर्वाधिक कर लावणारा देश आहे. या आयत्या उत्पन्नावर पाणी सोडण्यासाठी केंद्र सरकार तुर्तास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे तुर्तास पेट्रोल आणि डिझेल चढ्याच दराने खरेदी करावे लागणार आहे.
महाराष्ट्रातील शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा आजचा दर
मुंबई: पेट्रोल- 107.83, डिझेल 97.45 पुणे: पेट्रोल- 107.39, डिझेल 95.71 नाशिक: पेट्रोल- 108.14, डिझेल 95.85 औरंगाबाद: पेट्रोल- 109.12, डिझेल 98.69 कोल्हापूर: पेट्रोल- 107.89, डिझेल 95.97
मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक का?
मोदी सरकारचा सध्याचा एकूण नूर पाहता जनतेला आणखी काही दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सहन करावी लागू शकते. केंद्र सरकार इंधनावरील अबकारी दरात कपात करेल, अशी चर्चा होती. जेणेकरून पेट्रोल-डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले असते. मात्र, मोदी सरकार सध्या इंधनावरील करात कपात करण्याच्या मानसिकतेत नाही.
केंद्र सरकारने अबकारी दरात कपात केल्यास पेट्रोल-डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होईल. मात्र, त्यामुळे महागाई दरात जास्तीत जास्त 0.2 टक्क्यांचीच घट होईल. याउलट सरकारच्या तिजोरीतील महसूल 0.58 टक्क्यांनी कमी होईल. त्यामुळे इंधनाच्या करकपातीचा विशेष फायदा होणार नाही. परिणामी मोदी सरकार यासाठी फार अनुकूल नाही. तसेच इंधनावरील करकपातीमुळे महसूल कमी होईल. सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात ही गोष्ट केंद्र सरकारसाठी चांगली नाही. त्यामुळे इंधनाच्या दरातील कपात आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
संबंधित बातम्या:
देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…