‘या’ कंपन्यांचे तिमाही अहवाल जाहीर, नफ्यात मोठी घट; शेअर खरेदीपूर्वी वाचा तपशील
गेल्या वर्षीच्या तुलनेत आघाडीच्या तिन्ही कंपन्यांच्या नफ्यात (PROFIT) घसरण नोंदविली गेली आहे. नायका आणि एसीसी सिमेंटच्या उत्पन्नात वाढ दिसून आली आहे.
नवी दिल्ली : विविध क्षेत्रातील आघाडीच्या तीन कंपन्यांनी आर्थिक तिमाही (QUARTER RESULT) अहवाल घोषित केला आहे. सौंदर्य क्षेत्रातील अग्रणी नायका, बांधकाम क्षेत्रातील आघाडीची सिमेंट कंपनी एसीसी आणि औषध निर्मिती क्षेत्रातील अरविंदो फार्मा या तीन कंपन्यांनी डिसेंबर तिमाहीचे आकडे घोषित केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिन्ही कंपन्यांच्या नफ्यात (PROFIT) घसरण नोंदविली गेली आहे. नायका आणि एसीसी सिमेंटच्या उत्पन्नात वाढ दिसून आली आहे. अरविंदो फार्माचा उत्पन्नाचा आलेख घसरला आहे. नायकाचे एकूण नफा 57 टक्के घसरणीसह 29 कोटींवर पोहोचला आहे आणि एसीसी सिमेंटचा (ACC Cement) निव्वळ नफा 40 टक्क्यांच्या घसरणीसह 280 कोटींवर पोहोचला आहे. अरविंदोच्या निव्वळ नफ्यात 22.3 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली आणि नफा 604.29 कोटी रुपये झाला आहे.
नायका
तिसऱ्या तिमाहीचा निव्वळ नफा 57 टक्क्यांच्या घसरणीसह 29 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीसाठी कंपनीला 68.9 कोटी रुपयांचा नफा प्राप्त झाला होता. दरम्यान, कंपनीच्या उत्पन्न 36 टक्क्यांच्या वाढीसह 1,098.36 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी उत्पन्नाचा आकडा 807.96 कोटी इतका होता. नायकाच्या व्यवस्थापकीय संचालक फाल्गुनी नायर यांनी कोविड प्रकोप घटल्यामुळे सौंदर्य क्षेत्रात वाढ नोंदविल्याचे निरिक्षण मांडले आहे. आगामी काळात कंपनी नवीन दुकाने उघडणार आहे. कंपनीकडून नवनवीन उत्पादनांचा समावेश केला जाईल असे नायर यांनी म्हटले आहे.
एसीसी सिमेंट
आघाडीची सिमेंट कंपनी एसीसीने डिसेंबर तिमाहीची आकडेवारी घोषित केली आहे. कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा 40 टक्क्यांच्या घसरणीसह 280 कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी समान तिमाहित 472 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचे एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांच्या वाढीसह 4225.76 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
अरविंदो फार्मा
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहित अरविंदो फार्माचा नफा 22.3 टक्क्यांच्या घसरणीसह 604.29 कोटी रुपये झाला आहे. हैदराबाद स्थित आघाडीच्या औषधनिर्मिती कंपनीने गेल्या वर्षी समान तिमाहित 777.30 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. अधिक उत्पादन आणि मागणीत घट यामुळे कंपनीच्या कामगिरीत घसरण झाल्याचे मत अरविंदो फार्माच्या संचालकांनी व्यक्त केले आहे.
संबंधित बातम्या
टंचाईचा कोळसा : स्टील-अॅल्युमिनियम उद्योग संकटात, रोजगारांवर टांगती तलवार
चक्क सरकारच्या नावाने लॉटरीचं आमिष, “सजग राहा”, सरकारकडून सावधानतेचा इशारा
Share market मध्ये तेजीचे सत्र; अदानी विल्मरचा शेअर आजही ‘रॉकेट’