मालमत्ता कर भरा ऑनलाईन, BMC कडून खास मोबाईल अॅपची सुविधा
BMC | देयकांच्या अधिदानासाठी नेट बँकींगसह यंदापासून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, पेमेंट वॉलेट हेही पर्याय उपलब्ध, अधिदान करणे झाले अतिशय सोपे
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक वर्ष 2021-22 ची मालमत्ता देयके निर्गमित करण्यात आली आहेत. ही देयके बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचे अधिदान या संकेतस्थळावर तसेच महानगरपालिकेच्या मोबाईल ऍपद्वारे देखील करता येणे शक्य आहे. नेट बँकींगसह आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, पेमेंट वॉलेट हेही पर्याय महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिल्याने करदात्यांना देयकांचे अधिदान करणे आता अतिशय सुकर झाले आहे.
महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्व मालमत्ता धारकांना अवगत करण्यात येते की, सन 2021-22 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर देयके निर्गमित करण्यात आली आहेत. ही देयके बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
या देयकांचे अधिदान करताना महानगरपालिका संकेतस्थळावर पेमेंट गेटवे पद्धतीने देयक भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांच्या पेमेंट गेटवे माध्यमातून विनाशुल्क देयके भरता येतील. त्यात नेट बँकींग, यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट वॉलेट या पर्यायांचा देखील अवलंब करता येईल.
तर सिटी बँक (Citi Bank) च्या पेमेंट गेटवे माध्यमातून प्रति वापर (per transaction) 20 रुपये इतके शुल्क आकारुन देयके भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये नेट बँकींग हा एकच पर्याय उपलब्ध आहे.
तसेच, नागरिकांच्या सोयीकरीता SBI VAN (Virtual Account Number) ही विनाशुल्क सुविधाही उपलब्ध केली आहे. या ऑनलाईन सुविधेमुळे सर्व खाते धारकांना NEFT / RTGS आणि CBS (SBI to SBI) द्वारे कर देयकांचा सुलभतेने भरणा करता येणार आहे.
NEFT / RTGS पेमेंटची सुविधा
NEFT / RTGS करण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थ्यांचा खाते क्रमांक (Beneficiary Account Number) ➡ MCGMPTXXXXXXXXXXXXXXX (मालमत्ता कर देयकांवर नमूद मालमत्ता धारकाचा १५ अंकी लेखा क्रमांक लिहावा लागेल. या 15 अंकी क्रमांकाआधी MCGMPT – मालमत्ता करासाठी, MCGMPR – दुरुस्ती उपकरासाठी, MCGMPG – GPR मालमत्तांसाठी यापैकी योग्य लागू असेल तो संक्षिप्त शब्द नमूद करावा लागेल. त्यानंतर लाभार्थ्यांचे नाव (Beneficiary Name) MCGM; अकरा अंकी आयएफएससी संकेतांक (IFSC code) – SBIN0000300; (ही माहिती मालमत्ता कर देयकांवर दर्शिवली आहे). बँक (Bank) – SBI; शाखा (Branch) -Mumbai Main Branch; खाते (Account) – Current याप्रमाणे तपशिल लिहायचा आहे.
ऍंड्रॉइड / आयओएस आधारित mybmc 24 x 7 हे मोबाईल ऍप डाऊनलोड करुन त्याद्वारे नागरिकांना मालमत्ता कराचे अधिदान करता येते. त्यात नेट बँकिंगसह यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट वॉलेट या पर्यायांचा देखील विनाशुल्क अवलंब करता येईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागीय नागरी सुविधा केंद्रांवर देखील मालमत्ता कराचे अधिदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सबब, करदात्यांना विनम्र आवाहन करण्यात येते की, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑनलाईन अधिदान सुविधेचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा.
संबंधित बातम्या:
7th pay commission: निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA आणि ग्रॅच्युटी वाढणार
आता ‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
टेस्लाकडून भारतात इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली, मोदी सरकार आयात शुल्कात सूट देणार?