इंधन दरवाढीचा भडका उडणार, दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?
Petrol and Diesel | लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहेयेत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.
पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा दर 107.26 रुपये प्रतिलीटर इतका आहे. तर एक लीटर डिझेलसाठी 96.41 रुपये मोजावे लागतात. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 रुपये आणि 88.80 रुपये इतका आहे.
17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
‘…तरच पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणता येईल’
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या जीएसटी परिषदेत त्याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने पेट्रोल आणि डिझेलवर प्रचलित पद्धतीनेच कर आकारणी होईल. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यामागील कारण स्पष्ट केले. जीएसटी लागू करताना केंद्र आणि राज्य सरकारने दोन्ही पेट्रोल आणि डिझेलचा त्यात समावेश केला होता. जीएसटी कायद्यात अशी तरतूद आहे ज्याद्वारे पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. (Petrol and Diesel rates)
जेव्हा (जीएसटी) परिषद पेट्रोल आणि डिझेलचा दर नेमका किती ठेवायचा, हे निश्चित करेल तेव्हा इंधन जीएसटीच्या कक्षेत आणले जाईल. पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यासाठी जीएसटी कायद्यात कोणतीही नवीन सुधारणा करावी लागणार नाही. पण ते कधी आणि कोणत्या दराने आणायचे हे जीएसटी परिषदेला ठरवावे लागेल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?
…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?
पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…