गाडीत पेट्रोल टाकू की गाडीवर ! दरवाढीने महागाईचा आगडोंब, चांद्यापासून बाद्यांपर्यंत इंधन दरवाढीने वातावरण कमालीचे तापले
गेल्या 16 दिवसांत 14 व्या इंधन दरवाढीने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होत आहे. पैशांनी दरवाढ करत सरकारने सर्वसामान्यांचा जबरदस्त खिसा कापला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 10 रुपये प्रति लिटरने वाढल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईत सीएनजी किंमतीतही 2.50 रुपयांची वाढ झाली आहे.
‘अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे’ याची खरी प्रचिती या पंधरवड्यात देशातील नागरिकांना इंधन (Fuel) रुपाने आली आहे. गेल्या 16 दिवसांत 40 पैसे, 80 पैसे असा आस्तेकदम आलेल्या इंधन दरवाढीने (Petrol-Diesel Price Hike) सर्वसामान्यांच्या खिश्यावर प्रत्यक्षात दरोडा घातला आहे. दररोज अगदी किरकोळ दरवाढ करत सरकारने सर्वसामान्यांच्या खिशातून कधी 7 ते 10 रुपये काढून घेतले ते मोठा फरक दिसल्यानंतर समोर आले. सीएनजीवरील व्हॅट कमी केलेला असतानाही मुंबईत सीएनजीच्या(CNG) किंमती सात रुपयांनी तर पुण्यात सीएनजीच्या किंमती सहा रुपयांनी वाढल्या आहेत. मुंबईत पीएनजीच्या (PNG) दरात किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरकारी पेट्रोल कंपन्यांच्या या दरवाढीने उन्हाने लाही लाही होत असलेल्या सर्वसामान्यांच्या संतापाचा ही कडेलोट होत आहे. आता गाडीत पेट्रोल टाकावे की गाडीवर असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. राज्यातील अनेक शहरात या दरवाढीने उन्हापेक्षाही अधिक आगडोंब उसळला आहे.
व्हॅटची कपात पथ्यावर नाही
1 एप्रिलपासून राज्य सरकारने सीएनजीवर व्हॅट मध्ये 6 रुपयांची कपात केली होती. पण ही कपात चाकरमान्यांच्या पथ्यावर काही पडली नाही. 22 मार्चपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असतानाच मुंबईकर आणि पुणेकरांना आणखी एक झटका बसला. या दोन्ही शहरात सीएनजीच्या दरात वाढ झाली. थोडीथोडकी नव्हे तर थेट सात ते सहा रुपयांनी. पुण्यात सीएनजी गॅसची किंमत प्रति किलो 62.20 रुपये होती. ती सुधारित किंमतीनुसार 68 रुपये प्रति किलो झाली आहे तर मुंबईत एक किलो सीएनजीसाठी 60 रुपये आकारण्यात येत होते. आता मुंबईत सीएनजीची किंमत प्रति किलो 67 रुपयांवर पोहचली आहे. नवे दर मंगळवरी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.
जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधन दरवाढ
- देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईत 27 मार्च रोजी पेट्रोलची किंमत 113.88 रुपये प्रति लिटर होती. आज 6 एप्रिल रोजी पेट्रोलची किंमती प्रति लिटर 120.51 रुपयांवर पोहचली आहे. म्हणजे सात रुपयांची दरवाढ दिसून येते. तर डिझेलच्या किंमतीत ही सात रुपयांची वाढ झाली आहे. 27 मार्च रोजी डिझेल 98.13 रुपये प्रति लिटर होते, आज डिझेल प्रति लिटर 104.77 रुपये झाले आहे.
- शेजारील ठाण्यात 27 मार्च रोजी पेट्रोल प्रति लिटर 113.44 रुपये तर आज 6 एप्रिल रोजी 119.87 रुपये प्रति लिटर झाले आहे. डिझेलच्या किंमतीतील तफावत अशी दर्शविते की, 27 मार्च रोजी डिझेल प्रति लिटर 96.23 रुपये आणि आज 6 एप्रिल रोजी 102.56 रुपये आहे.
- वाईन नगरी नाशिकमध्ये 27 मार्च रोजी पेट्रोल प्रति लिटर 114.12 रुपये तर आज 6 एप्रिल रोजी 120.27 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. 27 मार्च रोजी डिझेल प्रति लिटर 96.91 रुपये आणि आज 6 एप्रिल रोजी 102.97 रुपये आहे.
- विद्येचे माहेरघर पुण्यात 27 मार्च रोजी पेट्रोल प्रति लिटर 113.60 रुपये तर आज 6 एप्रिल रोजी 120.13 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. 27 मार्च रोजी डिझेल प्रति लिटर 96.41 रुपये आणि आज 6 एप्रिल रोजी 102.83 रुपये आहे.
- समाजिक क्रांतीचे माहेरघर कोल्हापुरात 27 मार्च रोजी पेट्रोल प्रति लिटर 114.58 रुपये तर आज 6 एप्रिल रोजी 120.11 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. 27 मार्च रोजी डिझेल प्रति लिटर 97.38 रुपये आणि आज 6 एप्रिल रोजी 102.84 रुपये आहे.
- शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणा-या लातूरमध्ये 27 मार्च रोजी पेट्रोल प्रति लिटर 115.25 रुपये तर आज 6 एप्रिल रोजी 120.86 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. 27 मार्च रोजी डिझेल प्रति लिटर 98.02 रुपये आणि आज 6 एप्रिल रोजी 103.56 रुपये आहे.
- सामाजिक चळवळींचे माहेरघर औरंगाबादमध्ये 27 मार्च रोजी पेट्रोल प्रति लिटर 114.90 रुपये तर आज 6 एप्रिल रोजी 121.14 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. 27 मार्च रोजी डिझेल प्रति लिटर 97.66 रुपये आणि आज 6 एप्रिल रोजी 103.81 रुपये आहे.
- जगात जर्मनी आणि भारतात परभणी असलेल्या या शहरात 27 मार्च रोजी पेट्रोल प्रति लिटर 116.56 रुपये तर आज 6 एप्रिल रोजी 122.03 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. 27 मार्च रोजी डिझेल प्रति लिटर 99.26 रुपये आणि आज 6 एप्रिल रोजी 104.68 रुपये आहे.
- व्यापारी पेठ आणि सर्वाधिक तापणा-या अकोल्यात 27 मार्च रोजी पेट्रोल प्रति लिटर 113.61 रुपये तर आज 6 एप्रिल रोजी 120.61 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. 27 मार्च रोजी डिझेल प्रति लिटर 96.45 रुपये आणि आज 6 एप्रिल रोजी 103.33 रुपये आहे.
- ऑरेंज सिटी नागपूरमध्ये 27 मार्च रोजी पेट्रोल प्रति लिटर 113.75 रुपये तर आज 6 एप्रिल रोजी 120.47 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. 27 मार्च रोजी डिझेल प्रति लिटर 96.59 रुपये आणि आज 6 एप्रिल रोजी 103.19 रुपये आहे.
संबंधित बातम्या
पेट्रोल, डिझेल दर वाढीसोबतच पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या भावात वाढ
Petrol, diesel price: आज पुन्हा इंधनाच्या दरात वाढ, पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महाग