पेट्रोल-डिझेल स्वस्त व्हायचं स्वप्नं आता विसरा; खनिज तेलाचा दर 85 डॉलर्स प्रतिबॅरल, आता दरवाढ अटळ
Petrol Diesel | तेल विपणन कंपन्यांनी आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत किरकोळ वाढ केली आहे. मात्र, आगामी काळात परिस्थिती न सुधारल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी दरवाढ होऊ शकते.
नवी दिल्ली: देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींनी मंगळवारी उच्चांकी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलने 82 डॉलर प्रति बॅरलची पातळी पार केल्यानंतर या किंमती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती 2014 नंतरच्या उच्चांकी पातळीवर गेल्याने इंधनाचे दर पुन्हा वाढले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, तेल विपणन कंपन्यांनी आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत किरकोळ वाढ केली आहे. मात्र, आगामी काळात परिस्थिती न सुधारल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी दरवाढ होऊ शकते. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सहावेळा दरवाढ झाली आहे. इतके दिवस शंभरीच्या आतमध्ये असणारे डिझेलही आता महाग झाले आहे.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 25 पैसे आणि 32 पैशांची वाढ केली होती. पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.67 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 98.80रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 102.64 आणि 91.07 रुपये इतका होता.
कच्च्या तेलाचे तर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
भोपाळ आणि जयपूरमध्ये पेट्रोलच्या किंमतीचा नवा उच्चांक
या इंधन दरवाढीमुळे भोपाळ आणि जयपूरमध्ये पेट्रोलच्या किंमतीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 111 रुपये इतकी झाली आहे. तर डिझेलनेही शंभरी ओलांडली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सोमवारी पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 109.40 आणि 100.10 रुपये इतकी नोंदवण्यात आली. राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन (आरपीडीए) च्या आकडेवारीनुसार, जयपूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडली आहे.
दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहेयेत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.
इतर बातम्या:
कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?
दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका
खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?