दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

| Updated on: Sep 28, 2021 | 7:38 AM

CNG PNG Natural gas | देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित केले जातील. अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर सध्या 1.79 डॉलर्स इतका आहे.

दसरा-दिवाळीपर्यंत ही गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर कॉमन मॅनला आणखी एक झटका
पेट्रोल-डिझेल
Follow us on

नवी दिल्ली: ऑक्टोबरपासून गॅसच्या किंमतीमध्ये 70 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ होण्याचा अंदाज आहे. घरगुती गॅसच्या नवीन किमती 1 ऑक्टोबरपासून सरकार ठरवणार आहे. अशा परिस्थितीत ऑटो इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईप केलेल्या नैसर्गिक वायूच्या (पीएनजी) किंमती वाढतील. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कॉमन मॅनला इंधन दरवाढीचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्या चार दिवसांत डिझेल 70 पैशांनी महागले

गेल्या चार दिवसांमध्ये डिझेलचे दर तीनवेळा वाढले आहेत. त्यामुळे डिझेल 70 पैशांनी महागले आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी 24 सप्टेंबरला डिझेलच्या दरात 20 पैसे, 26 सप्टेंबरला 25 पैसे आणि आज 25 पैशांची वाढ केली होती. तुर्तास पेट्रोलची किंमत स्थिर आहे. सध्या मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.26 रुपये आणि प्रतिलीटर डिझेलसाठी 96.93 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 89.32 रुपये इतका आहे.

नैसर्गिक वायूच्या किंमती किती वाढणार?

देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित केले जातील. अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर सध्या 1.79 डॉलर्स इतका आहे. 1 ऑक्टोबरपासून APM चा दर 3.15 डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट (mmBtu) इतका होईल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी6 आणि बीपी पीएलसी (BP Plc) खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ऑक्टोबरपासून 7.4 एएमबीटीयू इतकी होईल. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किंमती 10 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहे. येत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.

संबंधित बातम्या:

जनआशीर्वाद कशासाठी? इंधन, गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की महागाई वाढवली म्हणून, जयंत पाटलांचा सवाल

नव्या वर्षात गॅसचा भाव वाढला आणि गावात पुन्हा चूलीचा धुराडा

CNG Price Hike Mumbai: मुंबईत CNG आणि पाईप गॅसच्या दरात वाढ