Bank | गलेलठ्ठ नोकरीच्या स्वप्नांची राख रांगोळी..या धोरणाने केला तरुणाईचा घात..
Bank | सरकारी बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेक तरुणांची धडपड सुरु असते. पण आता या नोकऱ्यांवर गदा येत आहे, काय आहे यामागील धोरण?
नवी दिल्ली : सरकारी बँकेत (Government Bank) गलेलठ्ठ पगाराची नोकरी (Service Jobs) मिळावी हे अनेक तरुणांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांची जीवतोड मेहनतही सुरु असते. भलीमोठी पुस्तकं पालथी घालून, टफ परीक्षा उत्तीर्ण होत, मुलाखतीला सामोरं जात, नोकरी मिळवणे हे अत्यंत जिकरीचं काम ते करतात.
पण त्यांच्या या स्वप्नांना आता सुरुंग लागला आहे. भरतीचे आकडे वर्षागणिक कमी होत आहे. या आकड्यांवर नजर टाकली तर सरकारी बँकांचे कर्मचारी भरतीचे उदासीन धोरण समोर येईल. या मागची कारणे शोधण्याचा हा प्रयत्न..
सरकारी बँकांमध्ये भरतीसाठी सामायिक भरती कार्यक्रमातंर्गत गेल्या वर्षी 7,858 पद भरती करण्यात आली होती. तर यंदा हा आकडा केवळ 6,035 इतका झाला आहे. तर ग्रामीण भागातील भरती प्रक्रिया ही प्रभावित झाली असून पद संख्या 6,898 हून 4,567 इतकी घटली आहे.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने भरती प्रक्रिया गोठवण्याकडे पाऊल टाकले आहे. ही प्रक्रिया संपूर्णतः बंद करण्याचे त्यांचे धोरण आहे. SBI ने भरतीसाठी एक वेगळी कंपनी स्थापन केली आहे. त्यानुसार, आता करार पद्धतीने कंत्राटी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
यामुळे बँकिंग क्षेत्रातील संघटनांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा मानस तर आहेच. पण या कर्मचाऱ्यांना पगारवाढ वा इतर अनुषंगिक लाभ देण्याची ही गरज राहणार नाही. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात कंत्राट पद्धतीने भरती प्रक्रियेवर जोर देण्यात येणार आहे. सध्या ग्रामीण आणि निमशहरी भागात ही प्रक्रिया राबविण्यात येईल.
SBI मध्ये State Bank of Hyderabad, State Bank of Mysore, State Bank of Patiala यांचे विलिनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे मोठा खर्च वाचला आहे. तसेच कर्मचाऱ्यांची गरज ही भरुन निघाली आहे. पण याचा दुसरा परिणाम आता नवीन कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेवर होत आहे.