Home Loan : ही चूक पडेल महागात, बँक नाही देणार गृहकर्ज, जाणून घ्या हा नियम
Home Loan : गृहकर्ज घेताना ही चूक करणे तुम्हाला महागात पडू शकते. ही चूक केली तर बँका तुम्हाला गृहकर्ज देणार नाहीत, होम लोन घेताना काय काळजी घ्यावी ते पाहुयात..
नवी दिल्ली : घर पहावे बांधून असे म्हणतात. कारण घर बांधणे हे अत्यंत जिकरीचे काम आहे. त्यासाठी कष्ट, वेळ आणि पैसा लागतो. अनेकदा इच्छा असूनही लोकांना त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. आर्थिक बाजू लंगडी असल्याने अनेकांना इमल्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. नोकरदार, मध्यमवर्गाला कर्जाच्या (Home Loan) जोरावर घराचे स्वप्न पूर्ण करता येते. कर्जाची रक्कम फार मोठी असते. हे कर्ज दीर्घकाळासाठी असते. त्यावर भरपूर व्याज द्यावे लागते. बँका (Bank) सहजासहजी होम लोनची प्रक्रिया पूर्ण करत नाही. त्यासाठी एक चूक पण तुम्हाला महागात पडू शकते.
याची पूर्तता करणे आवश्यक कर्ज देणाऱ्या बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या कर्ज देताना काही नियम आणि अटींची पूर्तता केल्याशिवाय कर्ज देत नाहीत. तुमचे वेतन, पेमेंट हिस्ट्री, क्रेडिट हिस्ट्री, कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांची पात्रता, अनुभव, कुटुंब, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या याचा विचार बँका करतात. यापैकी एक जरी माहिती चुकीची ठरली तर तुम्ही गृहकर्जासाठी अपात्र ठरतात. तुमचा कर्जासाठीचा अर्ज रद्दबातल ठरु शकतो.
क्रेडिटचा वापर कर्ज देणाऱ्या बँका मालमत्ता, सदनिकेच्या बाजार मूल्याच्या केवळ 80% कर्ज देतात. तर 30 लाख रुपयांपेक्षा कमी मूल्य असणाऱ्या गृहकर्जाबाबत ही मर्यादा 90% इतकी आहे. पण डाऊन पेमेंटची व्यवस्था तुम्हाला स्वतःलाच करावी लागेल. जर तुमच्या नावे इतरही कर्ज असेल तर तुम्हाला गृहकर्ज मिळण्याची सूतराम शक्यता नाही. मात्र तुम्ही यापूर्वीच्या कर्जाची एकरक्कमी परतफेड केली तर तुम्हाला गृहकर्ज मिळू शकते.
कमी क्रेडिट स्कोअर कोणती पण बँक, वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासतात. 750 वा त्यापेक्षा अधिक क्रेडिट स्कोअर हा चांगला मानण्यात येतो. कारण भविष्यात तुम्ही कर्जाची परतफेड करु शकता, हे त्यावरुन स्पष्ट होते. तुमच्यावर बँकांचा भरवसा वाढतो. कर्ज वा क्रेडीट कार्डच्या पेमेंटमधील विलंब तुम्हाला महागात पडू शकतो. तुमचा क्रेडिट स्कोअर त्यामुळे प्रभावित होतो. जर क्रेडिट स्कोअरच्या आधारे तुमची कर्जाची फाईल नामंजूर झाली तर क्रेडिट स्कोअर अपडेट करावा लागतो. अथवा जादा व्याज मोजून कर्ज मिळू शकते.
कर्ज परतफेड गृहकर्जासाठी अर्ज केल्यानंतर बँकेचा प्रतिनिधी तुमच्या मिळकतीची माहिती घेतो. तुमचे पगारपत्रक, एकूण संपत्ती याची माहिती घेण्यात येते. त्यासाठी तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, सॅलरी स्लिप इतर कागदपत्रांची माहिती घेण्यात येते. त्याद्वारे तुमच्याकडे कर्ज फेडण्याची क्षमता आहे की नाही, याची चाचपणी करण्यात येते. जर तुमची मिळकत, कमाई कर्ज रक्कमेपेक्षा कमी असेल तर तुम्हाला कर्जाची रक्कम देण्यात येत नाही.
कर्जदाराचे वय कर्ज घेताना कर्जदाराचे वय किती आहे, हा महत्वाचा मुद्दा असतो. बँका त्यावर अधिक भर देतात. जर तुमचे वय निवृत्तीवयाच्या आसपास असेल तर तुम्हाला कर्ज देण्यात येत नाही. कारण वाढत्या वयात कार्य क्षमता कमी होते आणि रक्कम परतफेडीची शक्यता कमी असते. त्यामुळे बँका कर्ज देताना वयाचा अगोदर विचार करतात.